मरवडे फेस्टीव्हलमध्ये होणार साहित्यिक व कलावंतांचा गौरव
प्रस्ताव सादर करण्याचे संस्थापक सुरेश पवार यांचे आवाहन
मंगळवेढा प्रतिनिधी
मरवडे ( मंगळवेढा ) येथील छत्रपती परिवाराच्या वतीने संपन्न होणाऱ्या मरवडे फेस्टीव्हलमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी साहित्यिक व कलावंतांचा गौरव करण्यात येणार आहे . या पुरस्कार योजनेत सहभागी होऊ ईच्छिणार्यांनी दि. ३ मार्च पूर्वी प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांनी केले आहे .
मरवडे येथील छत्रपती परिवाराच्या वतीने तुकाराम बीजेच्या मुहुर्तावर संपन्न होणाऱ्या गाव यात्रेचे औचित्य साधून २४ वर्षांपासून मरवडे फेस्टीव्हलचे आयोजन केले जाते . सांस्कृतिक , साहित्यिक , मनोरंजन व प्रबोधनाचे विविध कार्यक्रम या सोहळ्यात आयोजित केले जातात . सोलापूर जिल्ह्यातील मोठा सांस्कृतिक महोत्सव म्हणून मरवडे फेस्टीव्हलची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे साहित्य क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या एका साहित्यिकाचा व मागील दोन वर्षातील एका दर्जेदार साहित्यकृतीचा स्व.मुक्ताबाई कुंभार साहित्य गौरव पुरस्काराने गौरव करण्यात येईल . याशिवाय कला व लोककलेच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देऊन महाराष्ट्राची लोक परंपरा जतन करणाऱ्या दोन कलावंतांचा स्व. भागवतराव पवार कला व लोककला गौरव पुरस्काराने गौरव केला जाणार आहे .पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या साहित्यिक व कलावंतांचा सन्मानचिन्ह , मानपत्र , रोख रक्कम , शाल , फेटा , बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरव करण्यात येईल . तरी या पुरस्कार योजनेत सहभागी होऊ ईच्छिणार्या साहित्यिक व कलावंतांनी आपले प्रस्ताव व साहित्यकृती संस्थेकडे दि. ३ मार्च पूर्वी सादर कराव्यात असे आवाहन रावसाहेब सुर्यवंशी , ज्ञानेश्वर कुंभार , शशिकांत घाडगे यांनी केले असून अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्र. 7057475610 या क्रमांकावर संपर्क साधावा असे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे .

