प्रांत कार्यालयातील लाचखोर फरार तलाठी नळे ने अखेर लाचलुचपत पथकापुढे टेकले गुडघे
लाचखोर तलाठी सुरज नळे याच्या सह त्याच्या वरिष्ठांच्या संपत्तीची चौकशीची होतेय मागणी
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा प्रांत कार्यालयात कार्यरत असलेला तलाठी तथा आरोपी सुरज रंगनाथ नळे हा एका शेतकऱ्याकडून सात हजाराची लाच घेऊन मागील दोन दिवसापूर्वी फरार झाला होता. दरम्यान या आरोपी नळे हा दिनांक 1 एप्रिल रोजी एसीबीच्या पथकापुढे हजर झाला असून त्याला आज न्यायालयासमोर उभे करण्यात आले आहे
या घटनेची माहिती अशी की सोलापूर सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मध्ये बाधित झालेल्या पाईपलाईनची नुकसान भरपाईची मंजूर रक्कम एक लाख 43 हजार 794 रुपये शेतकऱ्याला देण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडे सात हजाराची लाच मागितली होती.दरम्यान ए सी बी च्या पथकाने धाड टाकून कारवाई केली मात्र आरोपीने चार चाकी गाडीतून पलायन केले पथकाने फिल्मी स्टाईलने त्याचा पाठलाग केला. कामती पोलीस स्टेशन हद्दीत गेल्यानंतर आरोपीने चार चाकी वाहन सोडून तो फरार झाला होता. या प्रकरणात एसीबी पथकाने खाजगी इसम तथा झिरो कर्मचारी पंकज चव्हाण याला अटक करून न्यायालयासमोर उभे केल्यानंतर त्यास चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. तलाठी आरोपीस जामीन मिळेल हे अपेक्षेने तो पळाला असेल असा चर्चा होती. मात्र मदतीचे सर्व दरवाजे बंद झाल्याने अखेर त्याने एसीबीच्या पथकासमोर दिनांक 1एप्रिल रोजी त्याने गुडघे टेकत हजर झाला आहे.
तलाठी नळे याच्या प्रांत कार्यालयातील कारभाराबाबत मोठ्या तक्रारी असून त्याने बाधित शेतकऱ्यांच्या भरपाई रकमा काढण्यासाठी शेतकऱ्याकडून कोरे चेक घेतल्याची चर्चा शेतकरी वर्गातून बोलली जात आहे. घेतलेले चेक द्वारे बँकेतून तो रकमा काढून त्याची विल्हेवाट व्यवस्थित रित्या लावत असे या भूसंपादनाच्या प्रक्रियेत शेतकऱ्याकडून येथील प्रांत कार्यालयातील कर्मचारी व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एजंटांच्या माध्यमातून 7ते 18 टक्के इतके कमिशन घेऊन कोट्यावधी रुपयांच्या रकमा ढापल्या आहेत.याची संपूर्ण चौकशी होणे आवश्यक असून नळे यांच्यासह त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. येथील बाधित शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्यास येथील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांकडून आर्थिक रकमेसाठी अडवणूक होत होती. येथील भ्रष्ट कारभाराबाबत विविध संघटना आणि अनेक वेळा आंदोलने देखील केली आहेत. या परिसरात दलालांच्या माध्यमातून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले उखळ पांढरे करून घेत शेतकऱ्यांना कोट्यावधीचा चुना लावला आहे. त्यामुळे आर्थिक लुटीचे केंद्र बनलेल्या या प्रांत कार्यालयातील भूसंपादनाशी संबंधित असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची संपत्तीची चौकशी करून त्यांची संपत्ती जप्त करावी व त्यांच्यावर बडतर्फ करण्याची मागणी होत आहे.

