डी.वाय.एस.पी.कार्यालयाकडून अवैध दारु धंद्यावर छापा
10 हजार 970 रुपयाचा मुद्देमाल जप्त, चौघा विरुध्द गुन्हे दाखल
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा डी.वाय.एस.पी. कार्यालयाकडून ग्रामीण भागात चालणार्या अवैध दारु धंद्यावर विविध ठिकाणी छापे टाकून10 हजार 970 रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करुन चौघा विरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.वाय.एस.पी. राजश्री पाटील यांनी पोलीसांचे पथक नेमून अवैध दारु व्यवसायावर धाडी टाकल्या. पोलीस पथकाने मरवडे ते बालाजीनगर जाणारे रोडच्या बाजूला चैतन्य ढाब्याच्या शेजारी अमर मासाळ हा बेकायदा दारु विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी दि.8 रोजी सदर ठिकाणी छापा टाकून 5 हजार 440 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
मरवडे ते येड्राव मार्गावरील एका पत्राशेडच्या बाजूला बाळू पवार हा इसम बेकायदा दारु विक्री करीत असलेल्या ठिकाणी पोलीसांनी छापा टाकून 1 हजार 330 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच रामचंद्र जगताप हा ही पत्राशेडच्या बाजूला दारु विकत असल्याचे समजताच पोलीसांनी सदर ठिकाणी छापा टाकून 1 हजार 360 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. असा एकूण वरील तीन ठिकाणी पोलीसांनी छापा टाकून 10 हजार 130 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
याच पथकाने खुपसंगी येथे छापा टाकून संजय चौगुले याच्याकडून 840 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. डी.वाय.एस.पी.कार्यालयाकडून केलेल्या कारवाईतून 10 हजार 970 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याची फिर्याद पोलीस नाईक सुनिल मोरे यांनी दिली आहे.

