हुन्नूर येथील प्रशांत साळे परिवाराकडून नवरात्र निमित्त महिलांना ‘आपुलकीची भेट’
आजोबांचा वारसा नातवाने जोपासला उपवासाचे ६०० किट चे वाटप
मंगळवेढा प्रतिनिधी
नवरात्र महोत्सव निमित्त हुन्नूर ता. मंगळवेढा येथे श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे व साळे परिवाराकडून हुन्नूर येथील 600 कुटुंबातील महिलांना उपवासाचे साहित्याचे किट ‘आपुलकीची भेट’ म्हणून देण्यात आले. सामाजिक कार्यात असलेला आजोबांचा वारसा नातवाने जोपासला असून त्यांच्या या कार्याबद्दल कौतुक होत आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असलेले प्रशांत साळे यांनी आपले दिवंगत आजोबा दलित मित्र बाबासाहेब साळे व आजी दिवंगत गोकुळाबाई साळे यांचे स्मरणार्थ नवरात्र महोत्सव निमित्त हुन्नूर येथील महिला भगिनींसाठी ‘आपुलकीची भेट’ हा उपक्रम राबविला.
प्रशांत साळे, वडील पुंडलिक साळे, भाऊ गणेश साळे उपसरपंच हुन्नूर यांनी नवरात्र महोत्सव निमित्त एक किलो साखर, एक किलो भगर, एक किलो शाबू, एक किलो शेंगदाणे, खजूर तसेच चहापत्ती आदी उपवासाचे साहित्याचे ६०० किट तयार करून हुन्नूर येथे घरोघरी जाऊन महिला भगिनींना ही भेट देण्यात आली. यावेळी बंडू खडतरे , अण्णासो क्षीरसागर, भगवान माने, शिवदास पुजारी, अरुण भंडारे, सुशांत माने ,आकाश भोसले आदी उपस्थित होते.प्रशांत साळे व साळे परिवाराकडून नवरात्र निमित्त राबवलेल्या या अनोख्या सामाजिक आपुलकीची भेट उपक्रमाचे हुन्नूर येथील ग्रामस्थ व महिला भगिनींकडून कौतुक व्यक्त होत आहे.
कोट
माझे आजोबा व आजीच्या स्मरणार्थ नवरात्र महोत्सवानिमित्त हुन्नूर गावातील महिला भगिनींसाठी उपवासानिमित्त एक ‘आपुलकीची भेट’ म्हणून हा उपक्रम राबविला असून भविष्यात देखील सामाजिक उपक्रम राबविले जाणार असून आजोबांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी कायम ठेवणार आहे.
-प्रशांत साळे अध्यक्ष श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळ, हुन्नुर

