मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केली मंगळवेढयातील विविध विकास कामांची पाहणी
संत दामाजीनगर च्या बगीचा कामाचे केले कौतुक
मंगळवेढा प्रतिनिधी
शासनाच्या निधीतून केली जाणारी विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे करा विकासात्मक कामाला आपला पाठिंबा असल्याचे सांगत जल जीवन ची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सोलापूर जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मंगळवेढा दिल्या.
सोलापूर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मंगळवेढा तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी संत चोखामेळा येथील अंगणवाडीची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच भाळवणी जिंती या 2515 मधून केलेल्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित रित्या सोय होत आहे की नाही यासाठी भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या जुनोनी येथील फिल्टर ला भेट देऊन योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून रोटेशन पद्धतीने 38 गावांना पाणीपुरवठा होत असल्याने या परिसरातील गावांना पाणीटंचाई पासून दिलासा मिळत आहे. तसेच यावेळी त्यांनी भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे थकीत वीजबिल ग्रामपंचायतीकडून वेळेवर भरण्याबाबतच्या सूचना देत कोणत्याही गावाला पाणीपुरवठा बंद राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सांगितले.
त्यानंतर त्यांनी संत दामाजीनगर प्रभाग क्रमांक 2 मध्ये जेष्ठ नेते बबनराव आवताडे व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब आसबे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या नागरी सुविधा व ग्रामनिधी योजनेतून 12 लक्ष रुपये निधीतून केलेल्या बागेच्या कामाची भेट देऊन पाहणी केली.यावेळी त्यांनी ग्रामपंचायतच्या या कामाबाबत कौतुक करीत शासनाच्या निधीतून सामाजिक हिताची व विकासाची कामे करण्यासाठी ग्राम पंचायतीनी प्राधान्य द्यावे, विकासात्मक कामाला माझा कायम पाठींबा राहील व निधीची मागणी पूर्ण केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी संत दामाजीनगर ग्रामपंचायत चे सरपंच जमीर सुतार, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता कुलकर्णी , गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील, जिल्हा परिषद बांधकाम विभाग प्रभारी उपअभियंता नंदकुमार कोष्टी, पाणीपुरवठा विभागाचे बी डी पांडव, कवचाळे साहेब,ग्रामविकास अधिकारी अरुण मोरे, ग्रामपंचायत सदस्य आण्णा आसबे, व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रभागातील उपस्थित महीलांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचा सत्कार करण्यात आला.

