बोराळे येथील महा ई सेवा केंद्र चालकाची बनवेगिरी, पोलिसात भरती झालेल्या तरुणीस दिले आर्थिक दुर्बलचे बनावट प्रमाणपत्र
केंद्र चालक घोडके विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मंगळवेढा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पोलीस दलात भरती झालेल्या बोराळे येथील तनुजा तानाजी नकाते ह्या तरुणीस आर्थिक दुर्बल घटकाचा (EWS) चा बनावट दाखला देवून बनवेगिरी केल्याप्रकरणी बोराळे येथीलच महा ई सेवा केंद्र चालक संजय घोडके याच्यावर मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या बाबतची फिर्याद नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांनी दाखल केली आहे. महा ई सेवा चालकाच्या या बनवेगिरी मुळे सदर तरुणीला पोलीस भरतीतून बाद व्हावे लागल्याने तिचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबतची माहिती अशी की बोराळे येथील तनुजा तानाजी नकाते हिची महाराष्ट्र राज्य पोलीस पदी भरतीत निवड झाल्याने पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई यांच्याकडून 14 सप्टेंबर रोजी (EWS) पडताळणी करीता प्रस्ताव आला होता. त्यानुसार तनुजा तानाजी नकाते हिचेकडील (EWS) ची महा ऑनलाईन प्रोर्टलवर बारकोड क्रमांकाची पडताळणी केली असता सदरचा दाखला हा आशुतोष बाळासाहेब गणेशकर यांचे नांवे दिल्याचे दिसून आले. परंतु बोराळे येथीलच महा ई सेवा केंद्र चालक सुहास सुर्यकांत घोडके याने सदरचे बारकोड क्रमांक तसाच ठेवून आशुतोष बाळासाहेब गणेशकर यांच्या नावामध्ये अनाधिकृतपणे तांत्रिक फेरबदल करून त्याठिकाणी तनुजा तानाजी नकाते हिचे नावे टाकून बनावट आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र दिल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे दि. 20 रोजी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे, मंडलाधिकारी धनंजय इंगोले, तलाठी भारत गायकवाड, यांनी तहसीलदाराच्या मदन जाधव यांच्या आदेशाने बोराळे येथील महा ई सेवा केंद्रास सील ठोकले. मंगळवेढा तहसीलदारांच्या आदेशाने दि 21रोजी चालक सुहास घोडके याच्या विरुध्द मंगळवेढा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील एका महा-ई-सेवा केंद्र चालकाने बनावट जातीचा दिल्याप्रकरणी जेल ची हवा खावी लागली होती.बनवेगिरीची आता दुसरी घटना घडल्यामुळे महा ई सेवा चालकांची आर्थिक हव्यासापोटी शासनाची व प्रमाणपत्र धारकांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे त्यामूळे या बनवेगिरी वर आळा घालण्यासाठी शासनाने कडक पावले उचलण्याची गरज आहे.

