मंगळवेढा संभाजी नागणे
लग्न म्हणजे दोन जीवांचे मीलन, आयुष्यभरासाठी एकत्र येवून संसाराच्या वेलीवर सुख दुःखात एकमेकाला साथ देण्याचे अभिवचन होय.लग्नाचा उत्सव एकदाच होतो त्यामुळे हल्लीची पिढी वारेमाप खर्चाची उधळपट्टी करून आनंद घेण्याचा एक उत्सव मानला जातो.परंतु या उत्सवाला फाटा देत फटेवाडी येथील संजय फटे यांची बी फार्मसीला असलेली मुलगी सुस्मिता आणि जाधव वाडी ता माळशिरस येथील शिवाजी जाधव यांचा गोवा येथे औषध कंपनीत असणारा मुलगा आशिष या उच्च शिक्षित जोडप्यांचा दोन्ही कडच्या बाजूच्या पाहुण्यांच्या संमतीने साखरपुड्यातच विवाह उरकला. अत्यंत साध्या पद्धतीने झालेल्या या सोहळ्यात या नव दाम्पत्यांनी आपल्या भावी वैवाहिक आयुष्य सुरुवात केली आहे साखरपुड्यातच विवाह उरकून अत्यंत कमी खर्चात लग्न होऊ शकते याचा आदर्श घालून दिला आहे सध्याच्या काळात आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती पाहता व सामाजिक डाम डौल न ठेवता असे विवाह करणे काळाची गरज बनली आहे.
फटेवाडी ता मंगळवेढा येथील संजय फटे यांची मुलगी सुश्मिता ही सांगोला येथे बी फार्मसीला असून तिचा विवाह जाधववाडी ता माळशिरस येथील शिवाजी जाधव यांचे सुपुत्र व गोवा येथे औषध निर्माता कंपनीत असलेले आशिष यांच्याबरोबर ठरला होता. त्यामुळे दिनांक 17सप्टेंबर रोजी फटेवाडी येथे साखरपुडा व टिळा या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यानुसार जाधववाडी येथील पाहुणे व फटे यांचे नातेवाईक आल्यानंतर दामाजी कारखान्याचे अधीक्षक दगडु फटे,एकलासपुर येथील गोरख ताड, प्रा. संतोष फटे प्रकाश काळुंगे यांनी दोन्ही बाजूच्या नातेवाईकांना साखरपुड्यातच विवाह सोहळा पार पाडूया असा प्रस्ताव मांडला. त्यावेळी ही कल्पना काही जणांना पटली काही जणांना पटली नाही.तसेच खुद्द मुलीला व तिच्या मैत्रिणींनी देखील सुरवातीला ही कल्पना पटली नाही. परंतु याबाबत समजावून सांगितल्यानंतर साखरपुड्यातच विवाह सोहळा उरकून घ्यायचा ठरला.याला वधु व वर पित्याने मोठ्या मनाने मान्यता दिली.
सुस्मिता ने देखील सगळ्याचा आदर राखत संमती दिली. सुस्मिताची व तिच्या मैत्रिणींची मानसिकता तयार करण्यासाठी चुलते दत्ता फटे, गोरख ताड,प्रा. संतोष फटे, माजी सरपंच विष्णुपंत फटे, सरपंच सीमा काळुंगे, प्रकाश काळुंगे, माजी सरपंच राजेंद्र फटे, कार्यालयीन अधीक्षक दगडू फटे आ समाधान आवताडे यांचे स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे यांनी प्रयत्न केले. सगळ्यांची मानसिकता झाल्यानंतर मग धावपळ सुरू झाली ती लग्नकार्याची. जयदीप रत्नपारखी यांच्या ज्वेलर्स मधून सौभाग्याचा असणारा दागिना मंगळसूत्र खरेदी केला. घाडगे कलेक्शनमधून वधू-वरांचे कपडे, फोटोग्राफर व्हिडिओ शूटिंग आणि कार्यक्रमासाठी लागणारे सर्वात महत्त्वाचे म्हणजे भटजी,आचारी यांच्या सह अनेकांच्या दृश्य, अदृश्य हाताने मदत केली.
साखरपुडा झाल्यानंतर लगेचच ग्रामदेवतांचे विधीवत दर्शन झाले. हळदीचा कार्यक्रम होवून विहीन, व्याही यांचे एकमेकांना आहेर झाले. नवरदेवाने बलशाली हनुमानाचे दर्शन घेतले. वधू वर स्टेज वरती आले. आणि लगेचच मंगलाष्टका होवून शुभमंगल सावधान झाले.सर्वांच्या मदतीमुळे लग्नकार्य सुरळीत पार पडले आणि वधूपित्याच्या व वरपित्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसू लागले. अन् आशिष आणि सौ. सुस्मिता यांच्या भावी वैवाहिक जीवनाची सुरवात सर्वांच्या साक्षीने झाली हा आनंदमयी सोहळयात फटे,जाधव व त्यांचा मित्र परिवार न्हावून निघाला.सद्या सामाजिक चित्र विदारक बनत असताना खोट्या प्रतिष्ठेसाठी प्रसंगी शेत विकून,कर्ज काढून अमाप खर्च करून लग्न समारंभामध्ये उधळपट्टी केली जाते.या खर्चाला आळा घालत सामाजिक भान ठेवत हा वाचलेला पैसा वधू वराच्या भावी आयुष्यासाठी वाचवून ठेवणे गरजेचे असते हाच प्रयत्न या परिवाराने केला आहे त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
या वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आ. समाधान आवताडे, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, संचालक औदुंबर वाडेकर, भारत निकम, बळवंतराव साहेब, रणजीतसिंह मोहिते पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जाधव साहेब, वधुपिता संजय फटे, वरपिता शिवाजी जाधव, प्रकाश काळुंगे आदी मान्यवर नातेवाईक,ग्रामस्थ उपस्थित होते.

