तळसंगी चे सुपुत्र रावबहादुर पाटील यांचा राज्य शासनाकडून 22-23 चा “उत्कृष्ट अभियंता पुरस्कार” देवून सन्मान
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व अप्पर सचिव मनिषा पाटणकर - म्हैसकर यांच्याकडून सन्मानित
मंगळवेढा प्रतिनिधी
तळसंगी चे सुपुत्र व शिरूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असणारे रावबहादुर यशवंत पाटील यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाकडून 22-23 चा “उत्कृष्ट अभियंता पुरस्कार” म्हणून अभियंता दिनानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत व राज्याच्या अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीमती मनीषा पाटणकर -म्हैसकर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथील असणारे राव बहादुर पाटील हे श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांचे बंधू आहेत.शिरूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे (उत्तर) कार्यक्षम कार्यकारी अभियंता रावबद्दूर यशवंत पाटील हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांचे पदविका शिक्षण शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर व पदवी के. आय. टी. कोल्हापूर आणि पदवीत्तर अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथून पूर्ण केले. सन 2000 मध्ये बांधकाम विभागात श्रेणी दोन या पदावर रुजू झाले. सन 2016 पासून ते कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत.
आंबेगाव मधील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज (अवसरी) ग्रामीण रुग्णालय मंचर, आदिवासी आश्रम शाळा वस्तीग्रह बांधकाम, भीमाशंकर विकास आराखडा, डिंबे येथील भीमाशंकर उद्यान, घोड नदीवरील महत्त्वाची पुलाची कामे, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी विकास आराखडा, टाकवे,आंबे येथील पुलाची कामे, ओतुर येथील ग्रामीण रुग्णालय, लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालय, खेड तालुक्यातील राजगुरू स्मारक विकास आराखडा, कान्हे येथील ग्रामीण रुग्णालय, वडगाव मावळ येथील प्रशासकीय इमारत, शिरूर तालुक्यातील जगप्रसिद्ध असणारे रांजणखळगे पर्यटन विकास आराखडा याच्यासह 2016 ते 2022 मध्ये पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत अनेक वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम केले.
बांधकाम क्षेत्रात काम करताना महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यात योगदान दिल्याने “उत्कृष्ट अभियंता” पुरस्कार षण्मुखानंद हॉल मुंबई येथे प्रदान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, आमदार दिलीप मोहते, आमदार सुनील शेळके, आमदार अतुल बेनके, माजी आमदार पोपटराव गावडे, सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक, दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील,जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बी.एन. बहिर यांनी अभिनंदन केले.

