बी.आर.माळी मंगळवेढ्याचे नवीन प्रांताधिकारी
वादग्रस्त आप्पासाहेब समिंदर यांची उचल बांगडी, माळी गुरुवारी स्वीकारणार पदभार
मंगळवेढा संभाजी नागणे
मंगळवेढा येथे गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेले प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांची अखेर बदली झाली असून त्या ठिकाणी सांगली येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत असणारे बी आर माळी यांची नियुक्ती झाली आहे.
सध्या राज्य शासनाकडून विविध विभागातील बदल्या सुरू आहेत. या बदलीचे शासन आदेश निघाला आहे.प्रांताधिकारी समिंदर यांच्या जागी मंगळवेढा येथे तहसीलदार म्हणून काम पाहिलेले बी आर माळी हे प्रांताधिकारी म्हणून येत आहेत त्यांनी तहसीलदार असताना मंगळवेढा महसूल विभागाचा नावलौकिक वाढवून महसूल विभागाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला होता. ज्या ठिकाणी तहसीलदार म्हणून काम पाहिले त्याच ठिकाणी त्यांना प्रांताधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळत आहे . त्यांच्या कार्यपद्धतीमुळे मंगळवेढ्यातील महसूल विभागातील नागरिकांची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे .त्यानी मोहोळ, चंदगड येथे तहसीलदार व पन्हाळा येथे प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या माळी हे सांगली येथे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
गेल्या दीड वर्षापूर्वी दिवसापूर्वी मंगळवेढा येथे प्रांताधिकारी म्हणून आप्पासाहेब समिंदर रुजू झाले होते परंतु त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या रकमा मिळण्याबाबत अनेक अडचणी निर्माण केल्या जात होत्या. तसेच येथील प्रांत कार्यालयात बाधित रकमा काढण्यासाठी दहा ते वीस टक्के पर्यंत ची निधीची मागणी होत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून होत होती. तसेच समिंदर हे रुजू झाल्यापासून हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत होते त्यांच्या विरोधात अनेक संघटनांनी, पक्षानी वारंवार आवाज उठवत आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. परंतु आपले वरिष्ठापर्यंत हात आहेत त्यामुळे आपल्याला कोणी काही करू शकत नाही या अविर्भावात हे प्रांत अधिकारी वावरत होते. गेल्या चार पाच महिन्यापूर्वी प्रांत कार्यालयातील तलाठी नळे हा भूसंपादनाच्या रकमेसाठी लाच घेताना आढळला होता त्यामुळे येथील प्रांत कार्यालयातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला होता. दामाजीपंताने मंगळवेढ्यातील जनतेसाठी ज्वारीची कोठारे खुली केल्याचा इतिहास असताना येथील महसूल मधील अधिकारी मात्र राष्ट्रीय महामार्गातील शेतकऱ्यांची लूट करून आपले खिसे भरण्याचा इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न देखील येथे झाला. त्यांच्या या भ्रष्ट कारभारामुळे महसूल खात्याची बदनामी होत होती.
त्यांच्या या भ्रष्ट कारभाराबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सोलापूर येथे एका बैठकीत समिंदर यांची चांगलीच खरडपट्टी केली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्याला जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्याचे सहकार्य लाभत असल्याने तो मुजोर झाल्याची चर्चा देखील अनेक वेळा होत होती. त्यांच्याबाबत अनेक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीमुळे अखेर त्याची उचल बांगडी करण्यात आली असून नव्याने त्यांना अजून कोणतेही पद दिले नाही अशी माहिती आहे
कोट –
माझी प्रांताधिकारी म्हणून मंगळवेढा येथे बदली झाली असून गुरुवारी मंगळवेढा येथील पदाचा कार्यभार घेणार आहे. नागरिकांची कामे वेळेवर व तत्परतेने मार्गी लावण्यासाठी आपला प्रयत्न असून महसूल विभागाच्या माध्यमातून मंगळवेढा सांगोला तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
बी. आर. माळी, नूतन प्रांताधिकारी मंगळवेढा
कोट –
येथील तत्कालीन प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर हे गोरगरीब शेतकऱ्यांची पिळवणूक करीत होते. महामार्ग बाधित शेतकऱ्यांकडून टक्केवारी घेतल्याशिवाय लाभार्थ्यांना रकमा देत नव्हते. याबाबत आपण शासनाकडे समिंदर यांच्यावर कारवाई करावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील तक्रार करून आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा दिला होता त्यामुळे शासनाने बदली केली आहे.
-संजय गेजगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख

