तहसीलदार मदन जाधव यांची संवेदनशीलता
ब्रह्मपुरी येथे चिखलामुळे ट्रॅक्टर मधून जाऊन केली स्थळ पाहणी तर बावची येथे शेतकऱ्याच्या घरी जाऊन दिला मदतीचा हात
मंगळवेढा संभाजी नागणे
सध्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल सर्वसामान्य नागरीकांमधून बरे बोलले जात नाही. अनेक वेळा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असते व कामे वेळेवर होत नाहीत परंतु मंगळवेढा येथे नव्याने दाखल झालेले तहसीलदार मदन जाधव यांनी या गोष्टीला फाटा देत शेतकऱ्यांप्रती आपली असलेली सामाजिक बांधिलकी आपल्या कामातून दाखवून देत सामाजिक संवेदना व कामाप्रती असलेली कर्तव्यनिष्ठा जोपासत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
पहिल्या घटनेत गेल्या आठ दिवसांपूर्वी मंगळवेढा तालुक्यात पावसामुळे अनेक गावात व वाड्या वस्त्या वरील रस्ते चिखलमय झाले होते. ही सबब न सांगता ब्रह्मपुरी येथे तहसीलदार मदन जाधव यांनी स्थळ पाहणी चौकशीसाठी गेले असताना सदर ठिकाणी जाणारा रस्ता पूर्णतः चिखलाचा असल्यामुळे ऑफिसची गाडी जात नव्हती म्हणून त्या ठिकाणी सुमारे दोन किलोमीटर पर्यंत चिखलाच्या वाटेतून ट्रॅक्टर मध्ये बसून सदर ठिकाणी जाऊन स्थळ पाहणी पूर्ण केली. माणसातला अधिकारी व अधिकार्यातील माणूस या उक्तीप्रमाणे तहसीलदार जाधव यांनी माणुसकीचे नाते दाखवून समोर आलेल्या कठीण परिस्थितीत देखील आपले कर्तव्य पार पाडले. यावेळी त्यांच्यासोबत तलाठी बालसाब शेख, महसूल सहाय्यक एस आर कोळी व अजित मुलाणी उपस्थित होते
तर दुसऱ्या घटनेत बावची येथील शेतकरी मल्लाप्पा सिद्राम माळी, व मंगळवेढा येथील संतोष बाळासाहेब वगरे यांची जनावरे वीज पडून मृत्युमुखी पडले होते त्यांना ३७ हजार ५०० रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश तहसीलदार मदन जाधव यांनी त्यांच्या घरी जाऊन शेतकरी कुटुंबियांच्या हाती सुपूर्त केला. खुद्द तहसीलदार आपल्या दारात आलेचे पाहून शेतकऱ्याचे डोळे पाणावले सध्या महसूल सप्ताह सुरू असून या अंतर्गत एक हात मदतीचा उपक्रम राबविला जात आहे या अंतर्गत आपदग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात येत आहेत. या प्रसंगी निवासी नायब तहसिलदार सी.के.हेडगिरे, महसूल नायब तहसिलदार एस.एस.साळुंखे, हाडगे, निवडणूक नायब तहसिलदार, महसूल सहाय्यक एस.आर.कोळी, साईनाथ आंदेलवार, महसूल सहाय्यक नितीन माळी आदी उपस्थित होते. यावेळी गावचे तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

