आ.समाधान आवताडे यांच्या मागणीला यश, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी आले मंगळवेढ्याच्या दक्षिण भागात
गावभेट दौऱ्यात शेतकऱ्यांनी केली होती पाण्याची मागणी, 17 गावांना होणार लाभ
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यात अद्यापही अपेक्षेप्रमाणे पर्जन्यमान न झाल्याने अनेक शेतकरी व पशुपालक पाण्याअभावी अक्षरशः हवालदील झाले आहे. दक्षिण भागाच्या गावभेट दौऱ्यात सदर गावातील नागरिकांनी म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याबाबत आ.आवताडे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील सर्व तलाव, बंधारे पाण्याने भरून देण्याबाबत आमदार आवताडे यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग सांगली म्हैसाळ कालवा यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. आमदार आवताडे यांच्या या पत्राची दखल घेऊन संबंधित विभागाकडून या योजनेचे पाणी संबंधित गावांना सोडण्यात आले असून या पाण्याचा या भागातील 17गावांना लाभ होणार आहे.
या पत्रामध्ये आमदार आवताडे यांनी नमूद केले होते की, मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये गावभेट दौऱ्यानिमित्त अनेक गावात दौरा करत असताना पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची खूप मोठ्या टंचाईला या भागातील जनता सामोरे जात आहे. पाण्याची उपलब्धता नसल्याने अनेक शेतकरी व पशुपालक आपले पशुधन जगवण्यासाठी चार ते पाच हजार रुपये प्रति टन या दराने उसाचा चारा दुसऱ्या तालुक्यातून आणत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी पशुपालकांसाठी ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. आ आवताडे यांनी या सर्व बाबींचा सखोल पद्धतीने विचार करून या योजनेचे पाणी लवकरात लवकर सोडण्यात यावे अशी मागणी संबंधित अधिकाऱ्यांना केली होती.
या भागातील जनतेचा पाणी प्रश्न व आमदार आवताडे यांच्या मागणीचा रेटा लक्षात घेऊन या योजनेचे पाणी तालुक्याच्या दक्षिण भागातील सर्व ओढ्यावरील सिमेंट बंधारे भरून घेण्यासाठी वितरिका क्रमांक – २ द्वारे पाणी उपलब्ध करून सोडण्यात आले आहे. या सोडलेल्या पाण्यामुळे या भागातील जनतेला दिलासा मिळाला असून पिके जोपासण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

