मंगळवेढा संभाजी नागणे
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी वरदायीनी असलेली व गेल्या दोन वर्षापासून बंद असलेली भोसे ४० गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना अखेर आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाली असून या योजनेचे पाणी जुनोनी येथील फिल्टर टाकी मध्ये दाखल झाले आहे. ही योजना दीर्घ काळानंतर सुरू झाल्याने या भागातील माय माऊलींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा बंद होवून नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मिळणार असल्याने आ समाधान आवताडे यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी 40 गावासाठी भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली होती. परंतु गेल्या अनेक दिवसापासून ही योजना विज बिल व पाणीपट्टी थकीत असल्याने बंद होती. या भागातील लोकांना यामुळे पाणी मिळत नव्हते. महिला वर्गांची पाण्यासाठी डोक्यावर पाण्याचे हांडे आणून होणारी कुचंबना, विकतचे टँकर घेऊन पाण्याची गरज भागण्यासाठी केलेले प्रयत्न या भागात दिसून आल्याने आ. समाधान आवताडे यांनी ही योजना कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याचा चंग बांधला. त्या दृष्टीने त्यांनी अधिकाऱ्यांच्या समवेत तीन ते चार वेळा बैठका घेतल्या.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील , पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ही योजना चालू करण्यासाठी धडपड सुरू ठेवली.
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असणारा पिण्याच्या पाणी प्रश्न सोडवून दुष्काळी तालुका असा मंगळवेढ्याचा कलंक पुसण्यासाठी आ आवताडे यांनी आपल्या लोकप्रतिनिधीत्व पदाचा आणि अधिकाराचा खूप व्यापकतेने वापर केला आहे. याचीच फलश्रुती म्हणजे गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असणारी भोसे ४० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा सुरु होण्यासाठी आ आवताडे यांनी वेळोवेळी शासन दरबारी आणि स्थानिक संबंधित प्रशासन यंत्रणेकडे लावलेला रेटा कामी आला आहे. ह्या योजनेचे 35लाख रुपये बिल महावितरण कडे प्रशासनाने भरले असून देखभाल दुरुस्तीसाठी दहा लाखाची तरतूद करीत सर्व यंत्रणांच्या माध्यमातून योजना सुरू होण्यासाठी प्रयत्न केले.
आमदार अवताडे यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे शुक्रवार, दिनांक २६ मे २०२३ रोजी जुनोनी येथील फिल्टर टाकीमध्ये या योजनेचे पाणी पोहचले आहे. हे पाणी योजनेच्या पुढील टप्प्यासाठी मार्गक्रमण झाले आहे असून ऐन उन्हाळ्यात दक्षिण भागातील गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.या योजनेतील 11 गावांना योजना सुरू झाल्यापासून पाणी मिळत नाही त्यामुळे या गावांना देखील पाणी कोणत्याही परिस्थितीत पोहचवण्याचा सूचना आ. अवताडे यांनी दिल्या आहेत. मतदारसंघातील मूलभूत आणि पायाभूत सोयी – सुविधा सक्षम करण्याबरोबरच अनेक वर्ष लोकांच्या मनात असणारी ही योजना स्थानिक पाणीपुरवठा अधिकारी व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मंडळींच्या सौजन्याने मार्गी लागल्याने जनतेमध्ये पाणीदार आमदार असे शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र मतदारसंघामध्ये निर्माण झाले आहे.

