संत चोखामेळा समता पुरस्कार डॉ.आ. गो. पुजारी यांना जाहीर
संत चोखामेळा व कान्होपात्रा यांच्या जीवन कार्या वरील संशोधन बद्दल पुरस्कार
मंगळवेढा प्रतिनिधी
संत चोखामेळा अध्यासन केंद्र पुणे व वृंदावन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी संप्रदायातील समता, बंधुता व मानवता या मुल्यांना केंद्रस्थानी मानून काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा २०२३ वर्षीचा संत चोखामेळा समता पुरस्कार प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी यांना जाहीर करण्यात आला आहे
प्राचार्य डॉ आ. गो.पुजारी यांनी संत चोखामेळा महाराज व परिवार तसेच संत कान्होपात्रा यांच्या साहित्य जीवन कार्यामध्ये केलेल्या संशोधन कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. तसेच याप्रसंगी संत चोखामेळा यांची जन्मभूमी असलेल्या मेहुणाराजा जि बुलढाणा येथे पुण्यतिथी सप्ताह सुरुवात केलेल्या, तसेच राज्यभर संत चोखामेळा महाराज व त्यांच्या परिवारातील सद्स्यांच्या विचार व साहित्य प्रचार कार्याबद्दल ज्येष्ठ प्रवचनकार व कीर्तनकार असलेल्या ह. भ. प. सुभद्रामाय खरात ( वय ८७ ) यांना विशेष सन्मानित करण्यात येणार आहे.
एकसंघ समाज हे राष्ट्रीय एकात्मतेचे मुख्य अधिष्ठान आहे. जात, पंथ, धर्म, प्रांत या पलीकडे जाऊन आपण सर्वजण भारतीय एक आहोत. हा विचार घेऊ सामाजिक एकतेसाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचे कार्य समाजासमोर घेऊन जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजे ‘ संत चोखामेळा समता पुरस्कार ‘ होय.
समता पुरस्कार २०२३ वितरण सोहळा संत चोखामेळा महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा दिवशी बुधवार १७ मे रोजी सायंकाळी ५ :३० वा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भाविसा सभागृह, सदाशिव पेठ पुणे येथे अ. भा. वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज, देहु संस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज, संत चोखामेळा अध्यासनाचे संस्थापक सचिन पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डाॅ. माणिकराव सोनवणे असणार आहेत.
या गौरव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संत चोखामेळा अध्यासन केंद्र अध्यक्षा प्राचार्या उल्काताई धावारे – चंदनशिवे संत चोखामेळा समता पुरस्कार निवड समिती विश्वस्त प्रा. सोमनाथ लांडगे यांनी केले आहे.

