मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या दोन घटनांच्या चौकशीसाठी दोन समित्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या समितीने चौकशी पूर्ण केली असून याचा अहवाल येत्या आठ दिवसांत सोलापूर येथील सिव्हिल सर्जन डॉ. पाटील यांच्याकडे सादर केला जाणार असल्याची पथका कडून देण्यात आली.
मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात गेल्या महिन्यात येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. सुलक्षणा जानकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सोमनाथ माळी यांच्यात वाद झाला होता. तर दुसऱ्या घटनेत येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरविंद गिराम ग्रामीण रुग्णालयात सातत्याने गैरहजर असतात तसेच येथील रुग्णालयात त्यांचे नियंत्रण नसल्यामुळे अस्वच्छता व रुग्णांना व्यवस्थित सेवा मिळत नसल्याची तक्रार माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्याकडे आल्याने प्रा.ढोबळे यांनी भर चौकात डॉ गिराम यांच्या कारभाराबाबत डिजिटल द्वारे आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगली होती तसेच प्रत्यक्षात ग्रामीण रुग्णालयात जाऊन तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच खरडपट्टी केली होती तसेच याबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली होती.
या दोन्ही प्रकरणामुळे ग्रामीण रुग्णालय चांगलेच चर्चेत आले होते व आरोग्य विभागाचा कारभार जनतेसमोर आला होता त्यामुळे या दोन्ही घटनेची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली झाल्या याप्रकरणी प्रत्येकी दोन सदस्य असलेल्या दोन समित्या नेमण्यात आल्या होत्या. डॉक्टर जानकर व माळी यांच्यातील वादाबाबत बाबत माळशिरस चे वैद्यकिय अधिकारी डॉ. काझी व अकलूजचे डॉक्टर गुडे यांची समिती नेमली होती. यांच्या समितीने येथील रुग्णालयात जावून चौकशी केली आहे.त्याचा चौकशी अहवाल आठ दिवसात दिला जाणार आहे.तर डॉ. अरविंद गिराम यांच्या तक्रारीबाबत सिव्हील सर्जन डॉ. डी. के. पाटील व डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्या समितीने दिनांक 24 एप्रिल रोजी चौकशी केली आहे. या समितीकडून ही आपला अहवाल सादर केला जाण्याची शक्यता असून ही समिती रुग्णांच्या तक्रारींची दखल दखल घेणार की आपल्या कर्मचाऱ्यांची पाठराखण करणार याबाबत सर्वसामान्य नागरिकांतून चर्चा होत आहे.
कोट –
मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या दोन्ही घटनाबाबत दोन समित्यांनी स्वतंत्र चौकशी केली आहे. त्यांना हवी ती माहिती दिली गेली आहे. तसेच मी शासनाकडून मंजुरी घेवून खाजगी प्रॅक्टिस करीत असून त्यासाठी शासनाच्या काही सुविधा,भत्ते नाकारले आहेत. ड्युटी संपल्यानंतर काय काम करायचे हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे.
डॉ अरविंद गिराम,
वैद्यकिय अधिक्षक, मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय

