कृषी महोत्सवानिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे 4 मे रोजी मंगळवेढा दौऱ्यावर
अन्न प्रक्रिया उद्योग वाढीसाठी 'कृषी उद्योजक मेळावा' - संस्था सचिव प्रियदर्शनी कदम महाडिक यांची माहिती
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील बेरोजगार युवक,महिला यांना रोजगार व शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग निर्मिती वाढीस लागावी यासाठी मंगळवेढा येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या वतीने मंगळवेढा येथे दिनांक 4मे रोजी केंद्रीय सूक्ष्म लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कृषी उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या सचिवा प्रियदर्शनी कदम महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम उपस्थित होते. मंगळवेढा येथे दरवर्षी दलित मित्र कदम गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी महोत्सवासोबत कृषी उद्योजक मेळाव्याचे आयोजन केले आहे.
यानिमित्ताने माहिती देताना
संस्थेच्या सचिव प्रियदर्शनी कदम महाडिक म्हणाल्या की,सोलापूर जिल्हा व मंगळवेढा तालुक्यात अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणात संधी असून कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना देखील त्याकडे उद्योजकता या बाजूने पाहिले जात नाही.केंद्र सरकारकडून अन्नप्रक्रिया उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात मदत केली जात असून याचा फायदा ग्रामीण भागातील शेतकरी,उद्योजक यांना व्हायला पाहिजे या उद्योगामुळे बेरोजगार युवक,महिला यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.तसेच अन्नधान्याची नासाडी कमी होवून उत्पादकाला योग्य ती किंमत मिळणार आहे.सोलापूर जिल्ह्यात तसेच मंगळवेढा तालुक्यात पिकणाऱ्या मालावर प्रक्रिया होवून त्याचे मार्केटिंग होणे गरजेचे आहे.आपण स्वतः अन्नप्रक्रिया उद्योगाचे परदेशात शिक्षण घेवून मार्केटकिंगचा अभ्यास केला असून अन्नप्रक्रिया उद्योग उभारणी साठी प्रोसेस चालू केली आहे.
मंगळवेढया सारख्या भागात नवीन उद्योग उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कृषी उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री राणे साहेबांच्या माध्यमातून एखादे फूड प्रोसेसिंग क्लस्टर उभा राहावे यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे.हल्ली नोकऱ्या प्रमाण कमी झाले असून अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये नोकरीच्या मोठ्या संधी आहेत.मंगळवेढा ज्वारीला जिआय मानांकन असून ज्वारीवर अन्नप्रक्रिया करून लहान मुलापासून मोठ्यापर्यंत अनेक उत्पादने बनवली जातात. त्यावर आपला भर राहणार आहे.
अन्नप्रक्रिया उद्योगाला चांगली बाजारपेठ मिळाल्यास या उद्योगातून लोकांना उत्पन्नाचे साधन व अनेक बेरोजगारांना रोजगार निर्माण होऊ शकतो.
शहरी व ग्रामीण भागतील महिलांना कडधान्य भाजीपाला फळे यातून उपपदार्थ निर्मिती साठी रोजगार मिळणार आहे. आंबा, केळी, पपई, पेरू या फळावर प्रक्रिया करून रोजगार निर्मिती होणार आहे. आ.समाधान आवताडे यांनी मंगळवेढा व पंढरपूर या भागात एम आय डी सी स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सध्या 40 पेक्षा जास्त अन्न प्रक्रिया उद्योग हे मंगळवेढा परिसरामध्ये सुरू होऊ शकतात. जिल्ह्यात अनेक अन्नधान्याच्या मालाचे उत्पादन होते मात्र त्याचे मार्केटिंग होत नाही. शहरी भागामध्ये इन्स्टंट फूड खाणाऱ्यांची संख्या वाढत असून शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी वेगवेगळ्या व अन्नपदार्थाची गरज आहे. अन्नप्रक्रिया उद्योग झाल्यास यातून ही गरज भागू शकते. अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी यासाठी उद्योग मंत्री नारायण राणे यांचा मंगळवेढ्याच्या दौरा उद्योजकासाठी फलदायी व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

