ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे व आ. समाधान आवताडे यांच्यात बाजार समितीसाठी एकजूट
कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर दोघात समेट
मंगळवेढा संभाजी नागणे
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव अवताडे व आमदार समाधान आवताडे या दोघांमध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मनोमिलन करण्यात बाजार समितीचे माजी सभापती विष्णुपंत अवताडे यांच्या शिष्टाई ला यश आले आहे.गेल्या काही निवडणुकीत विभागलेले आवताडे गट एकत्र येण्यावर शिक्कमोर्तब झाले असून यानिमित्ताने तालुक्यात आवताडे गटाची ताकद वाढणार आहे.
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीवर ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांच्या गटाचे वर्चस्व असून तालुक्यात सहकार क्षेत्रात त्यांचा दबदबा टिकून आहे. विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी आ समाधान आवताडे व बबनराव आवताडे हे स्वतंत्र लढले होते. दामाजी कारखाना निवडणुकीत आवताडे यांच्या विरोधात समविचारी आघाडीने समविचारी लोकांना एकत्र घेत दामाजी कारखाना जिंकला होता. दामाजी कारखाना निवडणुकीत आमदार समाधान आवताडे व बबनराव अवताडे हे दोघे अंतिम टप्प्यात ऐनवेळी एकत्रित आल्याने त्यांना त्याचा म्हणावा असा फायदा झाला नव्हता. याचा फायदा समविचारीला झाला होता. त्यामुळे दोन आवताडे गटात झालेल्या फुटीचा परिणाम गटाच्या ताकदीवर झाल्याने कार्यकर्त्या कडून दोन्ही गट एकत्रित येवून पुढील निवडणुका लढवण्याची इच्छा वारंवार व्यक्त होत होती.
त्यामुळे बाजार समिती चे माजी सभापती विष्णुपंत आवताडे यांनी पुढाकार घेत ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे व आ समाधान आवताडे यांच्यात शिष्टाई केली व त्यात त्यांना यश आले असून आवताडे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनातील दोन्ही आवाताडे एक व्हावेत ही इच्छा पूर्ण झाली आहे. निवडणुकीत आमदार समाधान आवताडे व ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे या दोघांना एकत्रित आणण्याच्या प्रयत्नामुळे बाजार समिती निवडणूक ही आवताडे यांच्यासाठी एकहाती होणार असून याचा परिणाम विरोधी समविचारी आघाडीवर होणार आहे दोन्ही गट एकत्र यावेत यासाठी गेल्या काही दिवसापासून खलबते सुरू असून विष्णुपंत आवताडे यांच्याबरोबरच दामाजीचे माजी व्हा चेअरमन अंबादास कुलकर्णी,माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे,बापुराया चौगुले,रमेश भांजे,धनंजय पाटील हे चर्चेत सहभागी होते.

