मंगळवेढा प्रतिनिधी
गोणेवाडी येथे शेतातील सामाईक विहिरीचे पाणी घेण्याच्या कारणावरुन एका 45 वर्षीय महिलेस दगडाने व ठिंबकच्या पाईपने मारहाण करुन अंगठ्याला चावा घेवून जखमी केल्याप्रकरणी दत्ता तुकाराम गरंडे, छाया दत्ता गरंडे, दाजी दत्ता गरंडे, दिपक दत्ता गरंडे या चौघाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी राजाबाई बाळु गरंडे व आरोपी तथा चुलत दिर दत्ता तुकाराम गरंडे यांचेत सामाईक विहिर असून दोघेही सहा-सहा दिवस पाळीने शेतीसाठी पाणी घेण्याचे ठरले होते. दि.25 रोजी सकाळी 7 वाजता फिर्यादी घरी असताना सामाईक विहिरीच्या पाण्याचा कॉक आरोपीने बंद केल्याने त्यास फिर्यादी विचारण्यास गेले असता आरोपीने शिवीगाळ करुन दमदाटी केली. तेव्हां आमचे तोंडभांड ऐकून अन्य वरील आरोपी पळत येवून फिर्यादीशी भांडण केले.
या भांडणात फिर्यादीच्या उजव्या हाताच्या अंगठ्यास चावा घेण्यात आला व दगडाने व ठिंबकच्या पाईपने पाठीत मारहाण केली. तर कुर्हाडीच्या दांड्याने डोकीत मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पती बाळू गरंडे हे मदतीस धावला असता त्यालाही ठिंकबच्या पाईपने मारहाण केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. जखमी फिर्यादीला पोलीसांनी दवाखाना यादी देवून तिच्यावर उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

