मंगळवेढा शहरातील नगरपालिका शाळांचा होणार कायापालट
नूतनीकरण, सुशोभीकरणसाठी२कोटी ३०लाख रुपये मंजूर - सोमनाथ आवताडे
मंगळवेढा प्रतिनिधी
राज्य सरकार च्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंगळवेढा शहरातील नगरपरिषद शाळांचा कायापालट व नूतनीकरण करण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून २कोटी ३०लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांनी दिली आहे.
सदर योजनेअंतर्गत मंगळवेढा शहरातील नगरपालिका शाळा नं.१ येथे नवीन इमारत खोल्या बांधणे १ कोटी २५ लाख, नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाक देणे ३१ लाख, सर्व नगरपालिका शाळांमध्ये आर. ओ. प्लांट बसवणे ३१ लाख, मंगळवेढा नगरपरिषद अंतर्गत खंडोबा गल्ली येथील विद्यार्थी उत्कर्ष मंडळ येथे अद्यावत अभ्यासिका बांधणे व इतर सोयी – सुविधा उपलब्ध करून देणे ३० लाख, शहरातील सर्व शाळांना भौतिक सोयी – सुविधा व सुशोभीकरण करणे ४४ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
शालेय पातळीवर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आणि शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत राहण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना आवश्यक व योग्य त्या भौतिक सोयी – सुविधा मिळणे अतिशय गरजेचे आहे. आधुनिक काळातील शिक्षणाची पद्धत मंगळवेढा शहरातील नगरपालिका विद्यार्थ्यांना सहजपणे आणि सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून सदर निधीची मागणी केली होती. मतदार संघातील विविध मूलभूत आणि पायाभूत बाबींच्या धोरणात्मक प्रगतीसाठी भरीव निधी आपल्या पदरात पाडून घेणाऱ्या आमदार आवताडे यांनी येणाऱ्या काळातील या देशाचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सक्षमीकरण व भौतिक सुविधा उन्नतीसाठी हा निधी उपलब्ध करून असल्याचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांनी सांगितले.
कोट –
मंगळवेढा नगरपरिषद शाळांची गुणवत्तेचा लौकिक महाराष्ट्रामध्ये असून येथून अनेक विद्यार्थी आज राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, व्यावसायिक व नामवंत खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आमदार समाधान आवताडे व माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या या निधीमुळे सर्व शाळांचा कायापालट होणार आहे.
– दिगंबर यादव
(सदस्य, न.पा.प्राथ. शिक्षण मंडळ मंगळवेढा)

