मंगळवेढा प्रतिनिधी
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची गुढीपाडवा या सणासाठी मिळणारी साखर 20रु प्रमाणे केली असून सभासदांना ती पूर्वीप्रमाणे 10 रुपये प्रमाणे देण्यात यावी अशी मागणी दामाजीचे संचालक व खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी दामाजी कारखाना प्रशासनाकडे केली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील दामाजी कारखाना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला आहे दामाजीच्या चांगल्या व वाईट काळात कारखान्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला गुढी पाडवा सण जवळ आला असुन या सणासाठी श्री संत दामाजी कारखान्याच्या सभासदांना सवलतीच्या दरात साखर देण्यात यावी. ज्या शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस दिला आहे. शेतकऱ्यांमुळे कारखाना यशस्वी गाळप करू शकला आहे. त्यामुळे गुढीपाडवा सण गोड व्हावा यासाठी सभासदांना 10 रुपये किलो प्रमाणे साखर वाटप करावी.पुुढील हंगामासाठी तालुक्यामध्ये ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात वाढलेले आहे.तसेच उजनी धरणामध्येही पुरेसे पाणी असल्याने पुढील गळीत हंगामामध्ये आपल्या कारखान्यास मोठया प्रमाणात गळीतासाठी ऊस उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडवा सणासाठी सभासदांना दहा रुपये किलो प्रमाणे साखर द्यावी व सभासद शेतकऱ्यांचा पाडवा गोड करावा अशी मागणी दामाजी कारखाना प्रशासनाकडे आवताडे यांनी केली आहे.

