मंगळवेढा प्रतिनिधी
मरवडे गावयात्रेच्या निमित्ताने दरवर्षी छत्रपती परिवाराच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा मरवडे फेस्टिव्हल सोहळा कलावंताचे माहेरघर म्हणून लौकिकपात्र ठरला असून या व्यासपीठाने अनेक कलावंताच्या कारकीर्दीला दिशा दिल्याचे गौरवोदगार आ.समाधान आवताडे यांनी काढले .
मरवडे फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी गुरुमाऊली ( भूदरगड ,कोल्हापूर ) प्रस्तुत गर्जा महाराष्ट्र माझा हा मराठमोळ्या कला संस्कृतीचे दर्शन घडविणार्या कार्यक्रमाचे उदघाटन आ. आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाले . याप्रसंगी बोलताना आवताडे यांनी कुठलाही कार्यक्रम चार दोन वर्षे चालविणे सोपे असते मात्र असंख्य अडचणीवर मात करीत छत्रपती परिवाराने केलेली रौप्यमहोत्सवी वाटचाल कौतुकास्पद असल्याचे नमूद केले .
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण , दामाजी शुगरचे संचालक अशोक केदार , सभापती सुधाकर मासाळ यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी व्यासपीठावर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, हणमंतराव दुधाळ , कारखान्याचे माजी संचालक बापू काकेकर , सचिन शिवशरण , बसवेश्वर पाटील यांच्यासह माजी सरपंच शिवाजीराव पवार , सुनिल शेणवे , परमेश्वर येणपे , राजाराम कालीबाग , माणिकराव पवार , दत्तात्रय गायवाले , चंद्रकांत गोडसे इ. मान्यवर उपस्थित होते .
त्यानंतर भूदरगड येथील ४३ कलाकारांच्या संचातील कलापथकाने भूपाळी ते भैरवी पर्यंत मराठमोळ्या लोकपरंपरांचे दर्शन घडविणारा कार्यक्रम सादर करुन रसिकांची मोठी दाद मिळवली. उत्कृष्ट वाद्यवृंद , गायकवृंद , ध्वनी , प्रकाश योजना , चपलख नृत्याविष्कार यामुळे जवळपास तीन तास मरवडे फेस्टिव्हलच्या रसिकांना मंत्रमुग्ध केले . या कार्यक्रमात पिंगळा जोशी ,धनगरी ओव्या , दिंडीसोहळा , वासुदेव , कडक लक्ष्मी ,पोतराज , गवळण, जात्यावरच्या ओव्या ,भारुड , जागरण गोंधळ ,भारुड, शेतकरी व कोळीगीते तसेच विविध नृत्याविष्कार सादर करुन रसिकांची दाद मिळवली.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक संयोजक सुरेश पवार यांनी केले तर सूत्रसंचलन बाळासाहेब कदम यांनी केले . शेवटी सर्वांचे आभार प्रविण गुंड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक जाधव , ज्ञानेश्वर कुंभार , संतोष पवार , राजेश कुलकर्णी , आबा पाटील , श्रीकांत लवटे , गणेश जगताप , सुरज शिवशरण यांच्यासह छत्रपती परिवाराच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

