मंगळवेढा प्रतिनिधी
मारापुर परिसरामध्ये मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल व वाहनांची सोय नसल्याने शाळेत जाऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी ‘सायकल बँक’ हा उपक्रम मारापुर ग्रामपंचायत मार्फत राबविणार असून आ समाधान दादा आवताडे यांच्या माध्यमातून या परिसराचा कायापालट करणार असल्याचे प्रतिपादन विद्यमान सरपंच व माणगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायक यादव यांनी केले.
येथील राजकुमार यादव मित्रमंडळाच्या वतीनेआयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी भुजंगराव आसबे हे होते.
सोलापूर जिल्हा परिषदेने स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील मुलींसाठी सायकल बँक सुरू केली आहे .सीईओ दिलीप स्वामी यांनी स्वतः एक सायकल देऊन या बँकेची सुरुवात केली. जिल्ह्यात पहिल्यांदाच सायकल बँक स्थापन करून ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या मुलीसाठी केलेली ही मदत खूपच चांगली ठरली आहे.
मारापुर परिसरामध्ये वाड्यावस्त्यावरील मुलींना शाळेत जाण्यासाठी वाहनांची सोय नाही. तसेच अनेक मुलींकडे सायकल नसल्यामुळे त्या शाळेपासून वंचित राहू नयेत व शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीकडून व लोकसहभागातून प्रयत्न केले जाणार आहेत यानिमित्ताने सोमवारी स्त्री जन्माचा जागर यासाठी प्रभात फेरी काढणार असल्याचे यादव यांनी सांगितले.
यावेळी भगवान आसबे, बाळासाहेब यादव, उपसरपंच अशोक आसबे ,डॉ. सत्यवान यादव नंदकुमार आसबे , बालाजी यादव, संतोष गांडुळे व सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब इंगोले यांनी तर आभार बाळासाहेब यादव यांनी मांडले

