….तो बेपत्ताअसलेला अल्पवयीन मुलगा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला
शाळेला का जात नाही असे विचारल्याने रागाच्या भरात मुलाने घेतला टोकाचा निर्णय
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा शहरातून बेपत्ता झालेला 15 वर्षीय मुलगा गुरुवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत कुटूंबियांना मिळून आला आहे. दरम्यान शिवराज भोसले (वय 15) असे गळफास घेतलेल्या मुलाचे नाव असून याची मंगळवेढा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, दि.17 रोजी दुपारी 12 वाजता मंगळवेढा शहराच्या दामाजी चौकातून शिवराज भोसले (वय15) याला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार त्याच्या कुटूंबियाने दिल्यानंतर मिसींग दाखल झाले होते.
गुरुवार दि.19 रोजी यातील खबर देणारे वडिल बसंती भोसले (रा.हाजापूर) यांचा मयत मुलगा शाळेला जात नव्हता म्हणून त्यास वारंवार समजावून सांगितले होते, तरी सुध्दा तो ऐकत नव्हता. तु बोर्डींंग शाळेत का जात नाही असे वडिल म्हणाले असता रागाच्या भरात अचानक तो दामाजी चौकातून कोठे तरी निघून गेला होता. याबाबत दि. 18 रोजी पोलिसात तशी तक्रारही दाखल करण्यात आली होती. दि. 19 रोजी दुपारी 1 वाजता खबर देणार्याचा भाऊ रवी काळे हे बेपत्ता मुलगा शिवराज याचा शोध घेत ते शहराजवळील जुना मारापूर रोडने शांतीनगर येथे गेले असता चिल्लाराच्या दाट झुपडात त्या मुलाने वायर पिशवीच्या बंधाच्या सहाय्याने चिल्लारी झाडाच्या फांदीला गळफास घेतल्याचे नातेवाईकास दिसून आले. त्यांनी शिवराजचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे घेवून गेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून तो मयत झाल्याचे सांगितले. असे दिलेल्या खबरी जबाबात बसंती भोसले यांनी म्हटले आहे.

