जिजाऊंनी संस्कार आणि शौर्य साधनेचा हिरा जगाला दिला : गणेश शिंदे
स्व महादेवराव(आण्णा) बाबुराव आवताडे प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्या वतीने जिजाऊ जयंतीनिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन
मंगळवेढा प्रतिनिधी
आजच्या प्रगत युगामध्ये महिला सक्षमीकरण आणि उन्नतीकरण करण्यासाठी माँसाहेब जिजाऊ यांचे विचार प्रत्येकाच्या मनात पेरणे गरजेचे आहे हिंदवी स्वराज्याच्या जननी असणारया जिजाऊंनी संस्कार आणि शौर्य साधनेचा हिरा जगाला दिला असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले .
स्व महादेवराव (आण्णा) बाबुराव आवताडे प्रतिष्ठान यांच्यावतीने जिजाऊ जयंतीनिमित्त इंग्लिश स्कुल मंगळवेढा येथे व्याख्यानमाला व महिला मेळावा या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंजली समाधान आवताडे या होत्या. शिंदे पुढे म्हणाले राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचे व्यक्तिमत्व म्हणजे मातृवात्सल्याचा आणि सामाजिक क्रांतीचा निर्मळ झरा होता हिंदवी स्वराज्यप्रती असणाऱ्या कर्तृत्वाने दैवत्वाला असणाऱ्या माँसाहेब जिजाऊ म्हणजे फक्त एक स्त्री व्यक्तिमत्व नसून संस्कार आणि शौर्य साधनेचा एक गौरवशाली कार्यमंत्र आहे. मंगळवेढा तालुक्यातील महिला – भगिनींच्या कर्तृत्व आणि नेतृत्व यांची व्यापकता समृद्ध करण्यासाठी आमदार समाधान आवताडे व त्यांच्या सुविद्य पत्नी अंजली समाधान आवताडे यांनी हाती घेतलेली ही मोहीम निश्चितपणे अधिक गतीने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचेल असेही व्याख्याते शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना अंजली आवताडे म्हणाल्या ४०० वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेऊन माँसाहेब जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या पाया बनल्या होत्या. त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा स्वराज्य संकल्पनेचा आदर्श आजच्या प्रत्येक मातेने आणि भगिनींनी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात प्रियदर्शनी महाडिक – कदम यांनी हिंदवी स्वराज्य गाथेचा इतिहास मंगळवेढा संत भूमीतील लोकांना सोप्या भाषेत समजवण्याचे काम प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे करीत आहेत हिंदवी स्वराज्य स्थापनेची संकल्पना मांडताना जिजाऊ नी संस्कार आणि संस्कृती यांची विधायक पद्धतीने मांडणी करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे शूर वीर योद्धा घडविला असल्याचे सांगितले
या कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी प्राचार्या मिनाक्षी कदम, अखिल भाविक वारकरी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती पार्वती आवताडे, उपसरपंच स्वाती जावळे, न. पा. प्राथ. शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव, भाजपा ओबीसी मोर्चा चे आदित्य मुदगुल, खंडू खंदारे, ग्रा. पं. सदस्य संजय माळी, सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य सुदर्शन यादव, माजी संचालक लक्ष्मण जगताप, माजी सरपंच बिभिषण बेदरे, उद्योजक गणेश बेदरे, संजय बेदरे, नवनाथ लेंडवे, तात्यासाहेब घोडके, दादासाहेब बेदरे, शिवाजी सावंजी, अनिल गायकवाड, आनंद मुढे, गणेश यादव, महादेव जाधव आदी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी तर प्रा. संगिता ताड यांनी मानले.

