पाच लाखाची लाच स्विकारताना मंगळवेढा पोलिस ठाण्यातील दोन पोलिस ए सी बी च्या जाळ्यात
अटकपुर्व जामीनसाठी सहकार्य करण्यासाठी दहा लाखाच्या लाचेची केली होती मागणी
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार महेश कोळी,पोलीस अंमलदार वैभव घायाळ या दोघांनी भविष्यात दाखल होणार्या गुन्ह्यामधून तक्रारदार यांचे आरोपी म्हणून असलेले नाव कमी करण्यासाठी तसेच इतर नातेवाईक यांना गुन्ह्यामध्ये अटकपुर्व जामीनसाठी सहकार्य करण्यासाठी दहा लाखाच्या लाचेची मागणी करुन पहिला हप्ता म्हणून पाच लाख स्विकारताना सांगली येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याने मंगळवेढ्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेची हकीकत अशी,यातील आरोपी पोलीस हवालदार महेश कोळी व पोलीस अंमलदार वैभव घायाळ मागील काही वर्षापासून मंगळवेढा पोलीस ठाण्यात ते दोघे कार्यकरत आहेत. तक्रारदार यांच्या विरुध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात एक अर्ज दाखल असून अर्ज चौकशी वरुन भविष्यात दाखल होणार्या गुन्ह्यामधून यातील तक्रारदार यांचे आरोपी म्हणून असलेले नाव कमी करण्यासाठी तसेच तक्रारदार यांचे इतर नातेवाईक यांना गुन्ह्यामध्ये अटकपुर्व जामीनसाठी सहकार्य करण्यासाठी वरील आरोपींनी दहा लाखाच्या लाचेची रक्कम गुन्ह्यातील रिकव्हरीच्या नावाखाली मागीतली असल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याचे वृत्तपत्रास प्रसिध्दीसाठी दिलेल्या पत्रकात लाचलुचपत पथकाने नमूद केले आहे.
दरम्यान दहा लाखापैकी पहिला हप्ता पाच लाख रुपये दोन्ही आरोपींनी स्विकारताना पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सदरची कारवाई पुणे विभागाचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे,अप्पर पोलीस उपायुक्त शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक उमेश पाटील,पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे,पोलीस अंमलदार ऋषीकेश बडणीकर,प्रितम चौगुले,अजित पाटील यांच्या पथकाने दि.25 रोजी ही कारवाई केली. मंगळवेढा पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला ही घटना घडल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.मंगळवेढा पोलिस ठाण्यात काही पोलिस भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने वागत असल्याचे दिसून येत असून त्या भ्रष्ट पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. पोलिसांच्या या भ्रष्ट वागण्यामुळे येथील पोलिस ठाणे व मंगळवेढा तालुक्याचे नाव बदनाम होत असल्याची तक्रार सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

