पोलिस निरीक्षक रणजीत माने यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी
मंगळवेढा पोलिस ठाण्यासमोर नागरिकांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यात वेश्या व्यवसाय, जुगार, गुटका, मटका, बेकायदा दारूविक्री, अवैध वाळू उपसा यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत आहे. तसेच अनेक तपास रखडले असून याला जबाबदार असलेल्या पो नी रणजीत माने यांची विभागीय चौकशी करून त्यांना तातडीने निलंबीत करण्यात यावे. यासाठी मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे यांच्या नेतृत्वाखाली येथील जेष्ठ नागरिकांसह विविध पक्षाच्या पदाधिकार्यांनी पोलिस स्टेशन समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.दरम्यान प्रभारी डी वाय एस पी डॉ अर्जुन भोसले यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने आंदोलन काही काळ स्थगित करण्यात आले आहे.
राज्यात संतांची भुमी म्हणून मंगळवेढा नगरीकडे पाहिले जाते. पो.नि.माने यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर दारू, मटका, जुगार, गुटखा, वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आंदोलनकर्त्यांची तक्रार असून त्यांची विभागीय चौकशी करून संबंधित अवैध व्यवसायाला जबाबदार धरून त्यांना निलंबीत करण्यात यावे. या मागणी साठी आज दिनांक 22रोजी आंदोलक पोलिस ठाण्यासमोर बसले होते. मागील दोन आठवडयापुर्वी लेंडवे चिंचाळे परिसरातील ज्ञानेश्वरी लॉजवर सोलापूर पोलिस अधिक्षक कार्यालयातील पथकाने धाड टाकून परराज्यातील वेश्या व्यवसाय करणार्या स्त्रियांची मुक्तता केली. कारखाना परिसरात या व्यवसायाने आता तेथे उच्छांद मांडला आहे. परराज्यातील एका बालकाचे अपहरण होवून सोळा महिन्याचा कालावधी उलटूनही अद्याप त्या मुलाला शोधण्यात स्थानिक पोलिसांना यश आले नाही. पो.नि.माने यांचा कार्यकाल संपूनही त्यांना मुदत वाढ दिली आहे. तसेच संबंधित अधिकार्याविरूद्ध वारंवार कोल्हापूर आय.जी.कार्यालयासमोर आंदोलन करूनही त्यांना मुदतवाढ कशी काय दिली जाते ? असा प्रश्न उपस्थित होत असून निंबोणी येथील कामू पाटील यांचा खून झाल्याचे त्यांच्या कुटुंबियाचे म्हणणे असतानाही त्या दिशेने तपास न करता पाटील कुटुंबियांना अद्याप ही न्याय न मिळत नाही. पो.नि.माने हे अकलूजचे असल्याने राजकीय पुढार्यांशी सलोख्याचे संबंध असल्याने बदली होवू नये यासाठी त्यांचा वापर करून घेत आहेत. पो.नि.माने यांनी येथीलअवैध व्यवसायावर कारवाई करणे त्यांचे कर्तव्य असताना त्यांनी कर्तव्य विसरून अवैध व्यवसायाला पाठबळ दिल्याने दारू जुगार मटका,अवैध वाळूउपसा गुटखा तस्करी वाढली असून त्यांची विभागीय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे. अशी मागणी आंदोलकांनी केली आहे तसेच यावेळी माने हटाव अशा घोषणा यावेळी दिल्या जात होत्या. जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत आंदोलन माघार घेणार नसल्याच्या भुमिकेवर ठाम असताना प्रभारी विभागीय पोलिस अधिकारी डॉ अर्जुन भोसले यांनी कारवाईचे आश्वासन आंदोलकांना दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, मधुकर बेदरे, शेतकरी संघटनेचे सिद्धेश्वर हेंबाडे, दामाजी माजी संचालक संभाजी लवटे, सरपंच अॅड.बिरूदेव घोगरे संचालक धन्यकुमार पाटील, मनोज चव्हाण, उद्योजक दिलीप उगाडे, विजय भोसले, सागर वाघमारे, शंभू नागणे, जनहित चे सर्जेराव गाडे, नाना बिचुकले, रवि पवार, धनंजय पवार, ज्ञानेश्वर सातपुते, दादा बुरजे, आनंद माळी, पोपट भोसले यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे व विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सिद्धेश्वर आवताडे मित्रपरिवाराचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

