जमीन नावावर करण्यासाठी पतीला केलेल्या मारहाणीत जखमी पतीचा झाला मृत्यू
पहिल्या पत्नीसह चार जणांवर गुन्हा दाखल
मंगळवेढा प्रतिनिधी
जमीन नावावर का करुन देत नाही असे म्हणत बांधुन श्रीमंत अन्नाप्पा बिरादार( वय 63 वर्ष, रा. जेऊर ता.इंडी जि.विजयपुर) या मेंढी व्यापाऱ्यास बरगडीजवळ, हाताला,मांडी जवळ रॉडने जोराने मारहाण करून जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मयताची पहिली पत्नी महादेवी, रावसाहेब पाटील, प्रकाश बिरादार, शिवराज बिरादार व इतर यांच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाणे विजयपुर रा.कर्नाटक येथे गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी पार्वती श्रीमंत बिरादार वय 35 वर्षे ही मयताची दुसरी पत्नी असून तिने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा नवरा श्रीमंत बिरादार व दोन मुलांसह जेऊर ता.इंडी, जि. विजयपुर येथे रहात असून मयत श्रीमंत हा मेंढीचा व्यापार करीत होता.श्रीमंत ने पार्वतीशी लग्न करण्याअगोदर महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील निंबोणी गावचे महादेवी हिचेबरोबर लग्न केलेले होते. तिला मुलबाळ न झालेने दुसरे लग्न केले आहे. श्रीमंत याच्या नावावर एकुण 04 एकर 20 गुंठे जमीन आहे. उर्वरीत 03 एकर 06 गुंठे जमीन ही महादेवी हिस देण्याचा करार झाला होता. सदर जमीन ही तिचे नावावर अजुन झालेली नाही. सदरची जमीन ही महादेवी हिचे नावावर करावी यासाठी महादेवी ही पार्वतीसोबत रागाने वागत होती.
दिनांक 1सप्टेंबर2023 रोजी पहाटे अंदाजे 03.00 वा. चे सुमारास श्रीमंत हा मेंढीचा व्यापार करण्यासाठी मंगळवेढा तालुक्याचे हद्दीजवळ असलेल्या माडग्याळ गावाला गेला होता. नंतर सायंकाळी 08.00 वा. चे सुमारास पार्वतीला फोन करुन श्रीमंत ने व्यापार संपवुन आपण निंबोणीला आलो आहे. तिथे मला जमीन नावावर का करुन देत नाही म्हणुन बांधुन मला महादेवी, रावसाहेब पाटील, प्रकाश बिरादार, शिवराज बिरादार व इतर लोकांनी बरगडीजवळ, हाताला रॉडने जोराने मारहाण केल्याने आतमध्ये जखम झाली, हाताने मांडीजवळ मारलेचे सांगितले.दरम्यान श्रीमंत मारलेल्या अवस्थेत घरी आले. त्यावेळी जखमांवर घरी उपचार करुन नंतर दिनांक 4सप्टेंबर रोजी 2023 रोजी जादा त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी विजापुर शहर जेएसएस दवाखान्यात दाखल केले. नंतर तिथुन त्याच दिवशी पुढील उपचारासाठी बिएलडीई दवाखान्यात दाखल केले. परंतु 6सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 01.24 वा. उपचार सुरू असताना श्रीमंतचा मृत्यु झाला.
या मृत्यूस पहिली पत्नी महादेवी,रावसाहेब पाटील, प्रकाश बिरादार, शिवराज बिरादार व इतर जबाबदार असून त्यांच्यावर एपीएमसी पोलीस ठाणे विजयपुर रा. कर्नाटक येथे गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा मंगळवेढा येथे वर्ग झाला असून अधिक तपास पो नी रणजित माने हे करीत आहेत.

