गावच्या विकासासाठी दिलेल्या निधीच्या दुप्पट मदत 2024 च्या निवडणुकीत आ.समाधान आवताडे यांना करणार – रामेश्वर मासाळ
अजित दादांच्या सत्ताप्रवेशाने मंगळवेढा दक्षिण भागात रामेश्वर मासाळ यांच्या रुपाने आ आवताडे यांची ताकद वाढणार...
मंगळवेढा संभाजी नागणे
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या विकासासाठीआ.समाधान आवताडे यांनी भरपूर निधी आणला असून माझ्या गोणेवाडी गावालाही भरघोस निधी द्या २०२४ ला गाव तुमच्या पाठीशी उभे राहून गावातून 2हजारांचे मताधिक्य देण्याची ग्वाही राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष व गोणेवाडीचे माजी सरपंच रामेश्वर मासाळ यांनी आ. आवताडे यांना गोनेवाडी करांच्या समक्ष दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सामील झाल्यानंतर मतदारसंघात अजित दादा समर्थक असलेल्या रामेश्वर मासाल यांनी प्रथमच भाजपा आमदार असलेल्या आवताडे यांना पाठिंबा देत आपली भूमिका उघड केली आहे.त्यामुळे आ समाधान आवताडे यांच्या बेरजेच्या राजकारणाला बळकटी येत असल्याचे दिसून येत आहे.तसेचआ अवताडे यांच्या गटाला दक्षिण भागात ताकद मिळणार आहे.
मंगळवेढा तालुक्यातील 81 खेड्यात आमदार समाधान आवताडे यांच्याकडून ‘आमदार आपल्या दारी’ हा गाव भेटीचा उपक्रम सुरू असून या भेटीद्वारे अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांच्या समस्या,अडचणी जाणून घेऊन त्यावर तातडीने जागेवरच मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आ. समाधान आवताडे यांनी आमदार झाल्यापासून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून आणून विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. तसेच अनेक गावात यापूर्वी निधी कमी मिळत होता परंतु अवताडे यांनी सर्वांना न्याय देत गट,पार्टी न पाहता गावच्या विकासासाठी निधी देण्याची भूमिका घेतल्यामुळे आमदार आपल्या दारी या गाव भेटीच्या दौऱ्यात अनेक विरोधी गटाचे नागरिक देखील आपल्या अडचणी येऊन सांगत असल्याचे दिसत आहे. आमदार अवताडे देखील विरोधी गटाचा नागरिक म्हणून त्याच्याकडे न पाहता विकासात्मक व सकारात्मक दृष्टीने मदत करीत आहेत.
सध्या राज्यात शिंदे शिवसेना,भाजपा व अजित पवार राष्ट्रवादी या तिघांचे सरकार सत्तेवर असल्याने मतदारसंघातील चित्रदेखील वेगळे बनत आहे. यापूर्वी भाजपाला राष्ट्रवादीचा विरोध असला तरी अजित दादा गटाने सत्तेत सामील झाल्यानंतर भाजपाला सहकार्याची भूमिका घेतली आहे. सध्या ट्रिपल इंजिनच्या सरकारकडून निधी मिळवत विकास कामे मार्गी लावण्यासाठी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची धडपड सुरू आहे. अनेक गावातील नागरिक व पदाधिकारी गावच्या विकासासाठी एकमेकांना शिंगावर न घेण्याची भूमिका घेत असून सत्तेतील आमदारांच्या माध्यमातून विकास कामांना प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या सुरू असलेल्या गाव भेट दौऱ्यानिमित्त
आ आवताडे गोणेवाडी येथे दाखल झाल्यानंतर येथील माजी सरपंच, गावचे नेते, राष्ट्रवादीचे माजी युवक जिल्हाध्यक्ष व अजित दादा समर्थक रामेश्वर मासाळ यांनी अजित दादांच्या सत्ताप्रवेशाने उघड भूमिका घेत आ. समाधान आवताडे यांना विकास कामांसाठी पाठिंबा देत असल्याची जाहीर भूमिका घेतली. ते यावेळी म्हणाले की राज्यात अजितदादा सत्तेत सामील झाल्यामुळेआम्ही सरकारमधील घटक पक्ष असून केंद्रात व राज्यात सरकार एकाच पक्षाचे आहे. त्यामुळे या सत्तेच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी आपण आमदार समाधान आवताडे यांना मदत करणार असल्याची भूमिका मांडली. ते म्हणाले आमदार समाधान आवताडे सरकारकडून विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊन कामाचा माणूस अशी आपली प्रतिमा तयार केली असून त्या माध्यमातून लोकांना आपलेसे केले आहे. आमचे नेते अजितदादा पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होत काम सुरू केले असल्यामुळे मीही त्यांच्याच आदेशाने आमदार समाधान आवताडे यांच्यासोबत अजित दादांचा पाठिंबा असेपर्यंत काम करणार आहे.
मी राजकारणात आल्यापासून नेहमी संघर्ष करत आलो असून नेहमी आमदारांच्या विरोधी पार्टीतच काम केले आहे. मात्र राज्य पातळीवर अजितदादा यांनी समझोता केल्याने मी ही तालुका पातळीवर समाधान दादांना मदत करण्याची भूमिका घेत आहे.मी गाव पातळीवरील राजकारणात काहीही करेन गावच्या राजकारणात कोणाचेही ऐकणार नाही पण गावाला मोठ्या प्रमाणात निधी द्या. २०२४ च्या निवडणुकीमध्ये निधीच्या दुप्पट वेगाने त्याची उतराई म्हणून तुम्हाला गावातून एक हाती मतदान केले जाईल असे रामेश्वर मासाळ यांनी गोणेवाडीच्या ग्रामस्थांसमोर जाहीर केले.
मासाळ यांच्या भूमिकेबाबत तालुक्यातून चर्चा होत आहे. मासाळ यांनी गाव विकासाच्या दृष्टीने घेतलेली भूमिका नागरिकांच्या हिताची ठरणारी असून आगामी काळातआमदार समाधान आवताडे गटाची वाटचाल बेरजेची राहणार असून याचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आवताडे यांना मासाळ यांच्या रूपाने दक्षिण भागात नक्कीच फायदा होणार आहे.

