कर्नाटकात सामील होण्याचा ठराव लवंगी च्या सरपंचाला नडला
महिला सरपंचांविरुद्ध सात मतांनी अविश्वास ठराव मंजूर
मंगळवेढा प्रतिनिधी
इतर सदस्यांना विश्वासात न घेता कर्नाटकात सामील होणार असल्याचा ग्रामपंचायत ठराव करणे लवंगी येथील सरपंचाला नडले आहे लवंगी येथे सरपंच अलका महादेव देवकर यांच्यावरील अविश्वास ठराव एक विरुद्ध सात मतांनी मंजूर करण्यात आला.
लवंगी येथे ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. या सभेत एकविरुद्ध सात मतांनी अविश्वास ठराव मंजूर केला. महिला सदस्य जयश्री गणपत मासाळ ह्या गैरहजर होत्या . सन २०२१ रोजी लवंगी ग्रामपंचायत निवडणूक झाली होती
कोट– लवंगी ग्रामपंचायतमध्ये एकविरुद्ध सात मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला आहे त्यामुळे रिक्त पदासाठी नवीन सरपंच निवडीसाठी प्रक्रिया राबविली जाईल. -स्वप्निल रावडे , तहसीलदार,मंगळवेढा
सरपंच अलका महादेव देवकर या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे, शासनाच्या विविध योजना राबविण्यास विरोध करणे, ग्रामपंचायतीचा खर्च मनमानी पध्दतीने करणे, ग्रामपंचायतीने बहुमताने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणे यासह कर्नाटकात सहभागी होण्याबाबत मनमानीपणे ठराव करणे या कारणांमुळे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर मतदान घेण्यात आले. कृष्णा मदन माने,मायाप्पा सोमाण्णा पांढरे,तानाजी मुरलिधर खडतरे,शाहीर हसन शेख,मनिषा बाबासो खडतरे,रेश्मा इलाही पाटील,पूनम विजय सवाईसर्जे या सात सदस्यांनी विरोधी मतदान केले.यामुळे सरपंच अलका महादेव देवकर यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले असून आता रिक्त पदासाठी नवीन निवड कधी होणार याकडे सदस्यांचे लक्ष लागून आहे.

