जल जीवन ची कामे दर्जेदार पद्धतीने करावीत अन्यथा कारवाईला तयार रहा – आ समाधान आवताडे
पाण्याचे टँकर, चाराडेपो सुरू करण्यासाठी प्रशासनाला सर्व्हेक्षण करण्याचे देखील दिले आदेश
आंधळगाव प्रतिनिधी –
संत दामाजी नगर,संत चोखामेळा नगर, आंधळगाव, लक्ष्मी दहिवडी गावासाठी जलजीवनच्या योजनेतून 28 कोटी ची कामे सुरू असून ही कामे दर्जेदार व चांगल्या पद्धतीने शासकीय निधीचा अपव्य न करता सर्वांना पाणी मिळेल असे सर्वेक्षण करून कामे करावी अन्यथा थर्ड पार्टी ऑडिट करून कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असा इशारा आमदार समाधान आवताडे यांनी आंधळगाव येथे दिला.
तसेच मंगळवेढा खरीप कोरडा गेला असताना रब्बीसाठी पावसाचा पत्ता नसल्याने नागरिकांची पाण्याची व जनावरांची चाऱ्याची सोय करण्यासाठी चाराडेपो आणि पाणी टँकर सुरु करण्याच्या पशुसंवर्धन, महसूल व कृषी विभागांनी तातडीने सर्वेक्षण करून येत्या ४ ते ८ दिवसांमध्ये प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आ समाधान आवताडे यांनी गावभेट दौऱ्यात दिले.
आमदार आपल्या दारी या अभियानाअंतर्गत आ आवताडे यांनी तालुक्यातील तब्बल ४२ प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत शुक्रवार पासून गावभेट दौरा सुरु केला आहे. आ आवताडे यांनी शनिवारी दिनांक 16रोजी तालुक्यातील अकोले, शेलेवाडी, गणेशवाडी, आंधळगाव, लेंडवे चिंचाळे, शिरसी, गोणेवाडी, खुपसंगी, जालिहाळ, हाजापूर या गावांचा गावभेट दौरा करुन जनतेच्या अडी-अडचणी व समस्या जाणून घेतल्या.
मंगळवेढा तालुक्यात खरीप हंगामातील पावसाची ओढ लक्षात घेता तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी पशुधन जतन करण्यासाठी चाराडेपो व जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी पाणी टँकर सुरु करण्याची मागणी जनतेतून मोठ्या प्रमाणात होत आहे.याबाबतआ आवताडे यांच्याकडे सदर मागणी नारिकांमधून केली जात होती. या संदर्भात आ समाधान आवताडे यांनी सद्या परिसरात चारा उपलब्धता नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपले पशुधन जगविण्यासाठी बाहेरील तालुक्यातून ४००० ते ५००० हजार रुपयांनी प्रतीटन दराने ऊस आणावा लागत आहे. सदर मागणीच्या सकारात्मक पूर्ततेसाठी व शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी हे प्रस्ताव लवकरात-लवकर सादर करावेत असेही आ आवताडे यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार डी. पी. बसविण्यासाठी कोणतीही हयगय करू नका अथवा शेतकऱ्यांना वेठीला धरू नका असा सक्त सूचना आ आवताडे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. येत्या ८ दिवसांमध्ये प्रत्येक गावात एक गाव एक दिवस मोहिम राबवून शेतकऱ्यांच्या विजेच्या संदर्भात असणाऱ्या सर्व समस्यांचा निपटारा करा असा आदेशही त्यांनी दिला. तसेच आंधलगाव येथील जलजिवन योजनेचे काम चुकीच्या पद्धतीने चालू असून त्याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली त्यावर आ आवताडे यांनी चुकीचे काम केल्यास कारवाई केली जाईल तसेच थर्ड पार्टी ऑडिट करून घेण्याचे संबधीत अधिकाऱ्यांना सांगितले. व्यवस्थित सर्वेक्षण करून वाड्यावस्त्यावर पाणी द्यावे, आंधळगाव येथे जुने झालेले नादुरुस्त झालेले दलित समाज मंदिर पाडून बौद्ध विहार बांधण्याची मागणी यावेळी केली.त्यास आवताडे यांनी तातडीने निधी देऊ असे सांगितले.
याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सुलभ वाट नसल्याचा अनुषंगाने आ आवताडे यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली व भूमी-अभिलेख, स्थानिक तलाठी व गावातील इतर जेष्ठ मंडळी यांची उपसमिती स्थापन करुन सदर प्रश्न लवकरात-लवकर निकाली काढण्याचेही आ आवताडे यांनी आदेशीत केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान पेन्शन योजनेसाठी जे शेतकरी लाभार्थी आहेत परंतु गेल्या अनेक हप्त्यापासून ते या योजनेपासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही व मार्गदर्शन करण्याचेही या दौऱ्यादरम्यान सूचित करण्यात आले. भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी उर्वरित गावांसाठी या योजनेतील पाणी व लाभार्थी गावांना दररोज मिळण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याचेही आ. आवताडे यांनी आदेशीत केले आहे.
शेलेवाडी, लेंडवे चिंचाळे, आंधलगाव या गावांमधून अनेक विद्यार्थी व इतर नागरिक यांच्यासाठी वेळेत व नवीन बसेस सुरू करण्यासाठी सकारात्मक विचार करणेबाबत एस टी महामंडळाला सूचित केले. मंजूर निधी तील कामे तातडीने पूर्ण करावीत,कामे दर्जेदार करावीत असेही त्यांनी संगितले.तसेच यावेळी त्यांनी गावभेट दौऱ्यात गेल्या काही वर्षातील विकास कामांचा बॅकलॉग भरून काढला जात आहे गावागावातील नागरिक राजकीय मतभेद विसरून विकास कामांसाठी एकत्र येत आहेत. ही भविष्यातील आपल्या विकास कामांवर, नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याची नांदी ठरत असून मतदार संघाचा विकास हेच आपले ध्येय असल्याचे त्यानी सांगितले. यावेळी विविध खात्याचे अधिकारी तसेच शिवाजीराव नागणे,सुरेश भाकरे,महादेव माळी, दत्तात्रय भाकरे,औदुंबर बनसोडे,अंकुश डांगे, आदम मुलाणी, अशोक लेंडवे, पांडुरंग लेंडवे,जितेंद्र लेंडवे, प्रदीप खांडेकर,धनंजय पाटील,अंबादास कुलकर्णी,विजय माने,सुनील वेळापूरे,चंद्रकांत जाधव, आप्पा स्वामी,निलेश आवताडे आदी उपस्थित होते.

