आई-वडिलांना सांभाळा अन्यथा वारस नोंद रद्द होऊन सोयी सुविधाचा लाभ होणार बंद
संत दामाजी नगर ग्रामपंचायतीने ग्रामसभेत केला अनोखा ठराव
मंगळवेढा संभाजी नागणे
मंगळवेढा येथील श्री संत दामाजी नगर ग्रामपंचायतीने अनोखा व सामाजिक गरजेचा असलेला ठराव केला असून वारसांनी आई वडिलांना न सांभाळल्यास त्यांची वारस नोंद रद्द केली जाणार आहे. तसेच वयस्क आईवडिलांचा संभाळ न करता त्यांना वृद्धाश्रमात ठेवल्यास ग्रामपंचायतीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सोई सुविधाचा लाभ देखील दिला जाणार नसल्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आई वडिलांची संपत्ती हडप करून त्यांना म्हातारपणी वाऱ्यावर सोडणाऱ्या वारसांना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.ग्रामसभेने केलेल्या या ठरावामुळे वयस्क नागरिकांना आधाराची काठी मिळाली आहे.
श्री संत दामाजीनगर येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा दिनांक 30रोजी सरपंच जमीर शेख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक, खरेदी विक्री संघ चेअरमन व दामाजी चे संचालक सिध्देश्वर आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी तरी सामाजिक बांधिलकी च्या हेतूने समाजातील आई-वडिलांना सांभाळण्याची प्रवृत्ती कमी होत असल्याने केवळ सत्ता संपत्तीच्या मागे लागून आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवून जगण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे ज्या आई-वडिलांनी कष्टप्रद जीवन मुलांना सांभाळले त्यांचे होणारे दुर्लक्ष पाहता जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव अवताडे व खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील दामाजी नगर ग्रामपंचायत ने अनोखा निर्णय घेऊन सामाजिक उत्तरदायित्व निभावले आहे. आज झालेल्या ग्रामसभेमध्ये दामाजी नगर हद्दीतील जे वारस आपल्या आई-वडिलांना सांभाळत नाहीत अशा वारसांची नोंद रद्द करण्याचा ठराव ग्रामसभेमध्ये केला आहे. तसेच जे नागरिक किंवा वारस आईवडीलांची संपत्ती आपल्या नावावर करून आई-वडिलांना न सांभाळता त्यांना वृद्धाश्रमात ठेवतील त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांचा लाभ न देण्याबाबतचा ठराव देखील यावेळी करण्यात आला आहे. वृद्ध व वयस्कर आई-वडिलांचा व पालकांचा जीवनाच्या अंतिम क्षणी चांगल्या पद्धतीने सांभाळ, सन्मान व्हावा या उदात्त हेतूने ग्रामपंचायतीने हा ठराव केला आहे.
तसेच सध्या जल जिवन योजने अंतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेसाठी वीज मोठ्या प्रमाणात लागणार आहे त्यामुळे विजेचा वापर कमी होऊन सौरऊर्जेचा वापर व्हावा यासाठी या पाणीपुरवठा योजनेस लागणाऱ्या विद्युतसाठी सौर ऊर्जा वापर करणेबाबतचा ठराव करणेतआला आला असून पुढील अमलबजावणीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे हा ठराव दिला जाणार आहे.तसेच यावेळी संत दामाजीनगर मधील अंगणवाड्यांना कपाट, टेबल, खुर्ची, विविध खेळणी व इतर साहित्याचे वाटप चेअरमन सिध्देश्वर आवताडे यांच्या हस्ते वाटप करणेत आले.
यावेळी सरपंच जमीर सुतार, ग्रा. पं सदस्य लक्ष्मण गायकवाड, अण्णासाहेब आसबे, संजय माळी, सोमनाथ शिंदे, नंदा ओमणे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव जावीर, पाणीपुरवठा समिती अध्यक्ष दिलीप उगाडे, संत चोखमेळा नगर ग्रा.पं.सदस्य विशाल जाधव, ग्रामविकास अधिकारी मोरे, कृषि व पशुसंवर्धन विभाग अधिकारी डॉ तानाजी भोसले,विजय जावळे, उमेश ढगे, लक्ष्मण बाबर, ज्ञानेश्वर वाघमारे, वैभव खराडे, डॉ. तळ्ळे. शिवाजी भोसले सर, माने सर, मोटे साहेब, शौकत मुलाणी, बाबा जाधव दीपक पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कोट –
हल्लीच्या स्पर्धेच्या युगात जग हे पैशाच्या मागे धावत असून आप्त नातेवाईक आई-वडील यांच्याकडे बघण्यास वेळ दिला जात नाही तसेच आई-वडिलांची संपत्ती हडप करून त्यांचा सांभाळ न करता त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याच्या घटना घडत आहेत या गोष्टींना आळा बसावा व आई-वडिलांना आपल्या मुलांसोबत नातवान सोबत राहावयास मिळावे या सामाजिक उदात्त हेतूने दामाजी ग्रामपंचायत करणाऱ्या वारसांची नोंद रद्द करण्याचा व आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून त्यांना दूर लोटणाऱ्या वारसांना कोणत्याही सोयी सुविधा दिल्या जाणार नाहीत असा ठराव करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
-श्री सिद्धेश्वर अवताडे,
चेअरमन खरेदी विक्री संघ मंगळवेढा
कोट –
जिल्ह्याचे जेष्ठ नेते व मार्गदर्शक बबनराव अवताडे व खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली आई-वडिलांना सांभाळ न करनाऱ्या वारसांची वारस नोंद रद्द केली जाणार असून वृद्धाश्रमात आई-वडिलांना ठेवणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायत कडून कोणत्याही सोईसुविधा दिल्या जाणार नाहीत हा ठराव केला असून या ठरावाची अंमलबजावणी ग्रामपंचायत कडून केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी अशी वेळ कोणावर येऊ देऊ नये याची खबरदारी घ्यावी.
-जमीर सुतार, सरपंच श्री संत दामाजी नगर मंगळवेढा

