शिक्षकांची पदे रिक्त ठेवून खाजगी शाळा चालवण्याची सुपारी घेतली आहे काय?-आ समाधान आवताडेंचा शिक्षण विभागावर प्रहार
जिल्ह्यात शिक्षकांची 650 तर मंगळवेढ्यात 131 पदे रिक्त
संभाजी नागणे
मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक शाळा शिक्षकांची 131 पदे रिक्त असल्याने सरकारी शाळा बंद पाडून खाजगी शाळा चालवण्याची सुपारी तुम्ही घेतली आहे काय? असा संतप्त सवाल येथील गटशिक्षणाधिकारी यांना आ समाधान आवताडे यांनी विचारत रिक्त पदे तातडीने भरा अशा सूचना शिक्षणाधिकारी जावीर यांना फोनवरून संपर्क साधत दिल्या.
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १५ जून पासून सुरू झाल्या आहेत. तब्बल महिना उलटत आला तरी मंगळवेढा तालुक्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी आहेत परंतु शिक्षक नाहीत अशी परिस्थिती झाली असून तालुक्यात सध्या 131 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आमदार समाधान आवताडे यांचा सध्या मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांमध्ये अडीअडचणी संदर्भात गाव भेट दौरा सुरू असून अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच विद्यार्थी प्राथमिक शाळांमधून खाजगी शाळांमध्ये जात असल्याचे सांगितले. यावेळी आमदार आवताडे यांनी उपस्थित गटशिक्षणाधिकारी पोपटराव लवटे यांना याबाबत जाब विचारला व शिक्षकांची पदे रिक्त ठेवून खाजगी शाळांमध्ये मुले पाठवण्याची सुपारी घेतली आहे काय असा सवाल उपस्थित केला. शाळा सुरू होण्याअगोदर शिक्षकांचे नियोजन करणे आवश्यक असताना शिक्षण विभाग याबाबत मात्र गाफील राहत आहे.
अनेक ठिकाणी शिक्षकांची मुले मोठ्या शहरात शिकत असतात मात्र ग्रामीण भागातील गोरगरिबांची मुले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिकत असतात परंतु सध्या तालुक्यात 131 शिक्षकांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाबाबत हेळसांड होत आहे. शाळा चालू होऊन महिना झाला तरीदेखील अनेक ठिकाणी शिक्षकाविना शाळा सुरू आहेत. एका शिक्षकांवर दुसरे वर्ग देऊन विद्यार्थ्यांना सांभाळले जात आहे.मराठी शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदामुळे विद्यार्थी बाहेर जाऊ लागले आहेत त्यामुळे ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली. या दौऱ्यात रिक्त शिक्षकांच्या पदाचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी तालुक्यातील रिक्त शिक्षकांची पदे तातडीने भरण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या दिल्या असून रिक्त जागेवर तातडीने शिक्षक देणार असल्याचे जावीर यांनी सांगितले.

