मंगळवेढा संभाजी नागणे
अहिल्यादेवी सिंचन योजनेतून विहिरी मंजूर असताना देखील निर्धारित वेळेत ज्यांनी विहिरीचे काम पूर्ण केले नाही त्यांना गरज नाही असे समजून त्यांची मंजुरी रद्द करावी व पुढील लाभार्थ्यांना मंजुरी देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवेढा येथे दिले.तसेच यावेळी त्यांनी जलजीवन च्या कामात कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नसून निकृष्ट कामे झाल्यास ठेकेदार व संबंधी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मंगळवेढा येथील पंचायत समिती कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी खाते प्रमुखांचे आढावा बैठक घेतली व सर्व विभागाचा आढावा घेवून सूचना दिल्या यावेळी त्यांनी प्रामुख्याने भोसे प्रादेशिक नल पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करून या भागातील लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले तसेच 35लाख वीजबिल भरून दुरुस्ती करून ही योजना अखेर सुरू झाली असून या योजनेतील 22 किमी पर्यंत पाणी गेल्याचे त्यांनी सांगितले.उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये यासाठी या योजनेतील गावांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच जल जीवन च्या कामाबाबत जिल्ह्यात सुरुवातीपासूनच तक्रारी येत होत्या त्यातील सोळा तक्रारी मध्ये सत्य आढळून आल्याने त्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई केली आहे. जलजीवन ची कामे गुणवत्ता पूर्ण व चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ग्रामस्थांसह अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे चुकीची व निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्या विरोधात कारवाई केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले जलजीवन च्या कामाबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी कामाचे अंदाजपत्रक काम सुरू झाल्याची व संपल्या ची तारीख, कामाचे अंदाजपत्रक हे त्या त्या ठिकाणी लावण्याचे सूचना दिल्या आहेत.
तसेच गेल्या काही दिवसापासून वैयक्तिक विहिरींना मंजुरी मिळत नाहीत,मंजूर झालेल्या विहीरींची कामे सुरू नसल्याने गरजू शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले असता नवीन विहिरींना तात्काळ मंजुरी द्यावी,मंजूर असलेल्या विहिरी निर्धारित वेळेस सुरू न झाल्यास त्यांना नोटीस देवून मंजुरी रद्द करून इतर लाभार्थ्यांना त्याचा लाभ द्यावा यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
……त्या कर्मचाऱ्यावर होणार निलंबनाची कारवाई
येथील बांधकाम विभागातील एक कर्मचारी अनेकजणांना आपल्या आखत्यारीत कामे करताना आर्थिक फायद्यासाठी अडवणूक करीत असल्याची तक्रार येथील ग्राम पंचायत सदस्य आण्णासाहेब आसबे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली असता त्यांनी गटविकास अधिकारी पाटील यांना याबाबतचा प्रस्ताव पाठवून द्या निलंबनाची कारवाई करतो असे आश्वासन आसबे यांना दिला.
जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जोडण्याचे काम 89 टक्के पूर्ण झाले असून राहिलेले काम लवकरच पूर्ण केले जाईल जर आधार कार्ड संलगणीकरण नाही झाल्यास शिक्षक अतिरिक्त होणार आहेत.त्यामुळे हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. जिल्ह्यातील दोन्ही पालखी मार्ग हरित मार्ग करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.चालू वर्षी वृक्ष लागवडीच्या केवळ घोषणा न करता जेवढे वृक्ष जोपासले जातील तेवढेच वृक्ष लावले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले. कचरा मुक्त अभियान, व्यसनमुक्त अभियान राबवून ग्रामीण भागात स्वच्छता व व्यसनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. स्थानिक पातळीवर गावे स्वच्छ ठेवण्यासाठी निधीच्या खर्चाला मंजुरी दिली जात असून व्यसनमुक्तीसाठी प्रबोधनात्मक मार्ग अवलंबले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .

