मंगळवेढ्यात पोलिसांना चोरटे ठरताहेत डोईजड
महमदाबाद (शे)येथे भरदिवसा बंगला फोडून 1 लाख 35 हजाराचे दागिने चोरटयांनी पळविले
मंगळवेढा प्रतिनिधी
महमदाबाद शेटफळ येथे बंगल्याच्या बाजूस असलेल्या झाडावर चढून बंगल्याच्या छतावरून घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटात ठेवलेले 1 लाख 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेण्याचा प्रकार भरदिवसा घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द् गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान,मागील आठवडयात रामकृष्ण नगर येथेे चोरीचा प्रकार घडला होता. हे चोरटे अदयाप सापडले नसताना आणखी चोरीचा प्रकार घडल्याने चोरटे येथील पोलिसांना डोईजड होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी बसवेश्वर सुडके हे व्यवसायाने शेतकरी असून महमदाबाद शे. येथे गावात दोन मजली बंगला आहे.दि.19 रोजी सकाळी 8.00 वा. फिर्यादी,फिर्यादीची पत्नी,आई वडील असे मिळून बंगल्याला कुलूप लावून शेतात कामाला गेले होते.ही संधी साधून चोरटयांनी बंगल्याच्या शेजारी असलेल्या शो च्या झाडावरून बंगल्याच्या छतावर जावून घरात प्रवेश करून दुसर्या मजल्यावर कपाटात ठेवलेले सोन्याचे 1 लाख 35 हजार रुपये किमतीचे दागिने कपाटाचे कुलूप उघडून चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान या मध्ये 12 हजार रुपये किमतीची 3 ग्रॅम वजनाची गळयातील ठुशी,15 हजार रुपये किमतीची 5 गॅ्रम वजनाची गळयातील ठुशी,24 हजार रुपये किमतीच्या 2 लेडीज अंगठया,32 हजार रुपये किमतीचे 2 गॅ्रम वजनाचे चार सोन्याचे बदाम,40 हजार रुपये किमतीचे 5 गॅ्रम वजनाचे कानातील फुले,12 हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाची लहान मुलाची अंगठी असा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला आहे. याचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक शेटे हे करीत आहेत.
दरम्यान दि.9 मे रोजी मंगळवेढा शहरातील रामकृष्ण नगर येथे बंगल्याच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून 2 लाख 31 हजार 741 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरटयांनी रात्री 11.30 वा. चोरून नेले होते.या घटनेतील चोरटे पोलिसांना सापडले नसताना पुन्हा भर दिवसा महमदाबाद शे.येथे चोरी झाल्याने नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत.यापुर्वी 11 चोर्यातील 2 युवक जेरबंद करूनही चोरीची मालिका थांबत नसल्याचे दिसून येत आहे.

