वटभरणाला जाऊन येतो म्हणून गेलेला गिराम पंधरा दिवस गायब….
डिजिटल द्वारे मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाच्या अब्रूची लक्तरे माजी मंत्री ढोबळे यांनी टांगली वेशीवर
मंगळवेढा संभाजी नागणे
मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे अरविंद गिराम यांच्या रुग्णालयातील अनुपस्थिती व रुग्णालयाच्या सोईसुविधा, अस्वछता याबाबत माजी पालकमंत्री प्रा लक्ष्मणराव ढोबळे यांनी कार्यकर्त्या समोर गिराम यांची चांगलीच खरडपट्टी केली व महिनाभरात कारभारात सुधारणा न केल्यास महिलांकडून चोप देवू असा इशारा देखील दिला त्यांनी एवढ्यावरच न थांबता भर चौकात एक अरविंद गिराम पंधरा दिवसापासून गायब, वट भरणासाठी जाऊन येतो म्हणून गेला तो पंधरा दिवस गायब…. स्वागतोत्सुक लक्ष्मण ढोबळे अशा प्रकारचे डिजिटल लावून ग्रामीण रुग्णालयातील त्या वैद्यकीय अधीक्षकाच्या कारभाराच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली असून त्या डिजिटल ची चर्चा मात्र सर्वत्र होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने कायम चर्चेत असतात.एखादा अधिकारी कामात हलगर्जी पणा करत असेल तर त्याला सरळ कसे करायचे याबाबत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा नाद अजूनही कोणी करीत नाही व मस्तीत वागणाऱ्या अधिकाऱ्याची कशी जिरवायची यात माहीर असलेल्या प्रा ढोबळे यांनी मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरविंद गिराम हे ग्रामीण रुग्णालयात सातत्याने अनुपस्थित राहतात रुग्णांना चांगले उपचार मिळत नाहीत,रुग्णालयात वाढलेली अस्वछता,घाणीचे साम्राज्य,या वाढत्या तक्रारीमुळे ढोबळे यांनी अचानकपणे दिनांक 19रोजी कार्यकर्त्यांसमवेत सकाळी 10ग्रामीण रुग्णालयात भेट दिली असता ओपीडी बंद होती.त्यावेळी हे गीराम गैरहजर होते महिला व पुरुष रुग्ण हे अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाट बघत बसल्याचे ढोबळे यांना दिसले. येथील अनागोंदी कारभार पाहून ढोबळे यांचा पारा चढला.तासाभराने गिराम आल्यानंतर त्यांची चांगलीच हजेरी घेत खरडपट्टी केली महिन्याला 90 हजार पगार घेवून काम न करता शासनाला चुना लावत असल्याचे सांगत येथील रुग्णांचे हाल,अपुरे कर्मचारी, अस्वछता,बंद असणाऱ्या मशीन,याकडे लक्ष वेधत महिना भरात सुधारणा करावी अन्यथा महिलांकडून चोप दिला जाईल असे सांगितले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांना ढोबळे यांनी आवरले अन्यथा गिराम यांना कामाचा प्रसाद मिळन्याची शक्यता होती.
कोट – मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांच्या दुर्लक्षतेमुळे रुग्णांचे हाल होत आहेत शासनाचा पगार घेवुन खाजगी व्यवसाय करीत असून येथे गैरहजर रहात असतात.तसेच येथील रुग्णांची होत असलेली हेळसांड, सोईसुविधाचा अभाव अस्वछता, अधिकारी व कर्मचारी यांचा उद्दामपणा यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत.सद्या शासन आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने देत असताना केवळ एखाद्या दुसऱ्या मस्तवाल अधिकाऱ्या मुळे रुग्णांना चांगली सेवा मिळत नाही. यासाठी आरोग्य मंत्री यांना भेटणार असून तालुक्यातील ढेपाळलेली आरोग्य सेवा, सिजर साठी जादा पैसे घेऊन रुग्णाची केलेली लूट याबाबत भेटून निवेदन देणार आहे. -प्रा लक्ष्मणराव ढोबळे
मंगळवेढा तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी मंगळवेढा येथे ग्रामीण रुग्णालय असून या रुग्णालयात गेल्या काही दिवसापासून सावळा गोंधळ सुरू आहे येथे कधी वैद्यकीय अधिकारी नसतात तर कधी रुग्णावर उपचार करताना एकमेकाकडे बोट दाखवले जाते त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालय नेहमी चर्चेत असते येथील वैद्यकीय अधीक्षक पद गेल्या अनेक वर्षापासून रिक्त होते परंतु गेल्या दोन महिन्यापासून येथील वैद्यकीय अधीक्षक पदी अरविंद गिराम यांची नियुक्ती झाली आहे. परंतु त्यांच्याकडे सांगोला येथील पदभार असल्याने त्यांना मंगळवेढा येथे वेळ देता येत नाही.त्यामुळे ते अनेक वेळा गैरहजर असतात याचा अनेक रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ज्यांच्याकडे आर्थिक कुवत आहे ते लोक मोठमोठ्या दवाखान्यात जाऊन उपचार घेत असतात. येथील गोरगरीब जनतेला मात्र ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. परंतु सध्या या रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना मिळणारी सेवा निकृष्ट दर्जाची असून त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. येथील काही कर्मचारी व अधिकारी आपल्या सोयीने येत जात असतात. याकडे वरिष्ठांचे मात्र दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पोस्टमार्टम ची सुविधा नसल्याने या ठिकाणी पोस्टमार्टम साठी मयत आणले जाते परंतु तेथे पोस्टमार्टम कोणी करावयाचे यासाठी दिवस दिवस थांबावे लागते याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी देखील झाल्या आहेत.
येथील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांची होत असलेली गैरसोय पाहता व अधीक्षक सातत्याने अनुपस्थित असल्यामुळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कारभारात सुधारणा व्हावी व रुग्णांना चंगल्या सोईसुविधा मिळाव्यात यासाठी प्राध्यापक ढोबळे हे दिनांक 20रोजी आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांना भेटून निवेदन देणार आहे.ढोबळे यांनी आज आपल्या स्टाईलने संबंधित अधिकाऱ्याला वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी देखील ढोबळे यांनी मंगळवेढा येथील प्रांत कार्यालयात शहर विकास आराखड्यावरून प्रांताधिकार्यांची चांगलीच खेचली होती. ढोबळे यांनी ग्रामीण रुग्णालयातील या कारभाराबाबत घेतलेल्या पवित्र्यामुळे सर्वत्र चर्चा होत आहे.

