मंगळवेढ्यात चोरटे पोलिसांना शिरजोर, भरदिवसा शिक्षकाचा बंगला फोडला, 6 लाख 43 हजाराचा मुद्देमाल लंपास
अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा शहरातील मित्रनगर मधील एका शिक्षकाच्या बंगल्यावर भरदिवसा डल्ला मारला असून चोरट्यांनी बंगला फोडून कपाटात ठेवलेले 6 लाख 43 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला असून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान मंगळवेढ्यात भरदिवसा घरफोडीचे प्रमाण वाढत असून या वाढणाऱ्या चोऱ्यामुळे चोरटे पोलीसांना शिरजोर ठरत असून जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीषकुमार देशपांडे यांनी लक्ष घालून वाढत्या चोर्या रोखाव्यात अशी मागणी होत आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी बिभीषण धोेंडीराम गवळी (वय 47 रा.मित्रनगर) हे पेशाने शिक्षक असून ते व त्यांच्या पत्नी ज्योत्सना दि.25 रोजी सायंकाळी 4 वाजता दोघेजण घराला कुलूप लावून भालेवाडी येथील शेतात जवस काढावयास गेले होते. रात्री 7.45 वाजता फिर्यादी व त्यांची पत्नी घरी आले तेव्हां गेटला लावलेले कुलूप काढून दोघेजण घराच्या मेन दरवाज्याजवळ गेले असता दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. फिर्यादीने बेडरुम मध्ये जावून पाहिले असता लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसला, कपडे अस्ताव्यस्त पडले होते. लोखंडी कपाटात ठेवलेले रोख 55 हजार तसेच 1 लाख 60 किंमतीच्या सोन्याच्या पाटल्या,60 हजार किंमतीचा सोन्याचा लक्ष्मी हार, 1 लाख किंमतीच्या सोन्याचे घंटन,1 लाख 20 किंमतीचे सोन्याचे घंटन, 60 हजार किंमतीचे जुबे, 40 हजार किंमतीची सोन्याची एक चेन,20 हजार रुपये किंमतीची सोन्याची नथ, 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी,8 हजार रुपये किंमतीचे सोन्याच्या पीळ्याची अंगठी असा एकूण 6 लाख 43 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
चोरटे पोलिसांना होतायेत शिरजोर –
अनेक दिवसापासून चोरटयाने भर दिवसा घरफोड्या करण्याचा सपाटा लावला असल्याने नागरिक धास्तावले असून या वाढत्या चोर्यामुळे बाहेरगावी जाणे मुश्किल झाले आहे. पोलीस प्रशासनाने यापुर्वी रात्रीच्यावेळी पडलेल्या दरोड्यातील चोरटे जेरबंद केले आहेत. मात्र आत्तापर्यंत भरदिवसा चोरट्यांनी केलेल्या घरफोडीतील चोरटे जेरबंद करण्यात अजून तरी पोलीसांना यश न आल्याने चोरट्यांचे मनोबल वाढून भरदिवसा चोर्या करण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याची चर्चा नागरिकामधून होत आहे. चोरटे हे भरदिवसा कुलूपबंद घरालाच टार्गेट करत असल्याने पोलीस प्रशासनाने यापुर्वी नागरिकांना ग्रामसुरक्षा यंत्रणेवरुन बाहेरगावी जाताना दागिने सुरक्षित ठेवण्याबाबत आवाहन देखील करत आहेत .

