मंगळवेढ्यातील कृषी सहाय्यकाने भ्रष्ट मार्गाने कमविले 14 लाख 93 हजार रुपये, पती-पत्नी विरुध्द गुन्हा दाखल
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यात कृषी सहाय्यक काशिनाथ यलाप्पा भजनावळे हे येथे कार्यरत असताना त्यांनी भ्रष्ट मार्गाने ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किंमतीची 14 लाख 93 हजार 817 रुपये अशी अपसंपदा संपादीत केल्याप्रकरणी सोलापूरच्या लाचलुचपतच्या विभागाने पती-पत्नी विरुध्द गुन्हा दाखल केला असून या कारवाईमुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेची हकीकत अशी,यातील आरोपी काशिनाथ यलाप्पा भजनावळे (वय 50) हे मंगळवेढा तालुक्यात कृषी सहाय्यक पदावर मार्च 1995 ते माहे 2014 मध्ये कार्यरत असताना त्यांनी भ्रष्ट मार्गाने त्यांचे व त्यांची पत्नी आरोपी किशोरी काशिनाथ भजनावळे (रा.सिध्दापूर) यांचे नावे संपादीत केलेल्या एकत्रीत अपसंपदा रक्कम 14 लाख 93 हजार 817 रुपये इतकी असून लोकसेवक काशिनाथ भजनावळे यांनी त्यांच्या पत्नीचे ज्ञात उपत्न्नाशी एकत्रीत टक्केवारी काढता 17.14 % इतकी अपसंपदा प्राप्त केल्याने स्वत:चे कब्जात बाळगून ठेवली असल्याने पती-पत्नी विरुध्द लाचलुचपत विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मंगळवेढा तालुक्यात भ्रष्ट मार्गाने पैसा कमविणार्या शासकीय कर्मचार्यावर व त्याच्या पत्नीवर पहिलाच गुन्हा दाखल झाला असून भ्रष्टाचार करणार्यामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे भ्रष्ट मार्गाने पैसे कमवून आपली संपती वाढविणाऱ्यामध्ये सध्या दबक्या आवाजात याबाबत मोठी चर्चा होत आहे.

