मंगळवेढा येथील वृक्ष लागवड योजनेमध्ये 14 कोटी 60 लाख आर्थिक घोटाळा प्रकरणी राज्याचे वनसचिव वेणू गोपाल रेड्डी यांच्यासह 13 जणावर चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे मंगळवेढा न्यायालयाचे आदेश
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागातील वृक्ष लागवड योजनेमध्ये वनअधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची वृक्ष लागवड न करता बोगस वन मजूर दाखवून बनावट कागदपत्रे तयार करून बाहेरील राज्यातील वनमजुरांच्या नावे तसेच स्वतःच्या जवळच्या नातलगांच्या नावे 14 कोटी 60 लाख रुपयांचा आर्थिक गैर व्यवहारा केल्याप्रकरणी मंगळवेढा न्यायालयाचे न्या. देवर्षी यांनी राज्याचे वनसचिव वेणू गोपाल रेड्डी यांच्यासह 13 जणावर चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी मंगळवेढा तालुक्यात वृक्ष लागवड योजनेमध्ये 14कोटी60लाखाचा आर्थिक घोटाळ्या बाबत मंगळवेढा येथील न्या. देवर्षी यांच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर सुनावणी घेऊन न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यानुसार राज्याचे वन सचिव वेनू गोपाळ रेड्डी, सुनिता सिंग प्रधान मुख्य सामाजिक वनीकरण पुणे, हणूमंत धुमाळ वनसंरक्षक सामाजिक वनीकरण पुणे, तत्कालीन जिल्हा विभागीय वनाधिकारी सुवर्णा रवींद्र माने, विद्यमान जिल्हा विभागीय वनाधिकारी मनीषा पाटील, हरिश्चंद्र वाघमोडे जिल्हा विभागीय वनाधिकारी, कल्याणी रामदास गोडसे तत्कालीन वन अधिकारी मंगळवेढा, निलिमा खुशाल खोब्रागडे वन अधिकारी मंगळवेढा, अमित अरून मुळीक तत्कालीन वन अधिकारी मंगळवेढा, अशोक चैधरी वन अधिकारी, शिला शिवाजी बडे वन अधिकारी मंगळवेढा, राजू सर्जेराव आटोळे वन अधिकारी, रंगनाथ मनिलाल नाईकडे या सर्व वन अधिकारी यांची चौकशी करून सामाजिक वनीकरण विभाग मंगळवेढा या कार्यालयामध्ये झालेल्या14 कोटी 60 लाख आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून सामाजिक वनीकरण विभागाचा आर्थिक घोटाळा मोठ्या स्वरूपाचा असल्याने या प्रकरणाच्या तपासासाठी स्पेशल पोलीस अधिकारी नेमणूक करण्याबाबत चे आदेश ही न्यायालयाने मंगळवेढा पोलिसांना दिले आहेत तसेच या सर्व प्रकारनाचा तपास करून अहवाल न्यायालयात सादर करणेबाबत आदेश दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांच्या वतीने एडवोकेट ज्ञानेश्वर गायकवाड , एडवोकेट मंगेश राऊत, एडवोकेट श्री मर्दा एडवोकेट रामलिंग कोष्टी यांनी काम पाहिले.
चौकट –
या घोटाळयाची व्याप्ती फक्त मंगळवेढा तालुक्या पुरती मर्यादित नसून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा आहे. राज्याच्या वनमंत्र्यांनी सुधीरभाऊ मनगंटीवार यांनी या प्रकरणी लक्ष घालावे तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या व सामान्य जनतेची पैशावर दरोडा टाकणाऱ्या राज्याच्या वनसचिवासह वनाधिकाऱ्याना कायमचे सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. राज्याच्या वनमंत्र्यांनी याची दखल न घेतल्यास सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासह राज्यभर आपण दोषी वन अधिकारी यांच्यावर आपण गुन्हे दाखल करणार आहोत.
-दादासाहेब चव्हाण

