खरीप हंगाम पिकविम्यासाठी सेवा सुविधा केंद्र चालकांनी एक रुपये पेक्षा जादा शुल्क शेतकऱ्यांकडून घेऊ नये अन्यथा कारवाई -गणेश श्रीखंडे
मंगळवेढा प्रतिनिधी
सध्या खरीप हंगाम सुरू आहे. प्रतिकूल हवामानामुळे पेरणी होऊन उगवण न होणे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती जसे की गारपीट, भूस्खलन, ढगफुटी , पूर, दुष्काळ, इत्यादी कारणामुळे पीक पेरणी पासून काढणीपर्यंत 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्यास विमा मंजूर होऊन शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा होते. त्यासाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या सेवा सुविधा केंद्रावर जाऊन ऑनलाईन प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज भरणे आवश्यक आहे. प्रती पीक केवळ एक रुपया शुल्क भरावे.विमा भरताना सेवा सुविधा केंद्र चालकांनी प्रति पिकासाठी एक रुपये पेक्षा अधिक शुल्क शेतकऱ्यांकडून घेऊ नये अन्यथा कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल अशी माहिती मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी दिली.
राज्य शासनाने पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक उदंड होऊ नये यासाठी एक रुपयांमध्ये पिक विमा भरण्याची योजना सुरू केली आहे त्यानुसार खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्यास सुरुवात केली पिक विमाअर्ज भरताना सोबत सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, घेऊन जावे व स्वयंघोषित पीक पेरणी प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे .शेतकऱ्यांकडून प्रती पीक एक रुपया व्यतिरिक्त कोणतेही जादा शुल्क, सेवा सुविधा केंद्र चालकांनी घेऊ नये. याची दक्षता घ्यावी अन्यथा लेखी तक्रारी आल्यास संबंधित सेवा सुविधा केंद्र चालकावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत कृषी आयुक्त यांनी सूचना दिलेले आहेत .त्यानुसार कारवाई करण्यात येईल याची दक्षता घ्यावी.
खरिप हंगाम पीक विमा भरण्या साठी अंतिम दिनांक 31 जुलै आहे. पिक विमा भरण्यासंदर्भात शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे दरम्यान तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे व कृषी सहाय्यक प्रशांत काटे यांनी काही केंद्रांना भेटी देऊन पिक विमा भरण्याबाबत ची माहिती केंद्र चालकाकडून जाणून घेतली एक रुपयापेक्षा जास्त शुल्क आकारू नये अशा सूचना दिल्या आहेत

