हातचालाखी करत गुरुजींना घातला 1 लाख 51 हजार रुपयाला गंडा
ए टी एम मधून पैसे काढून देण्याचा बहाणा,अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा येथील बँक ऑफ इंडियाच्या ए.टी.एम. मशीन मधून पैसे काढून देण्याचा बहाणा करीत ए.टी.एम. कार्ड घेवून पीनकोड विचारुन ए.टी.एम. मशीन मधून पैसे निघत नसल्याचे सांगून हातचालाखी करीत खात्यावरील 1 लाख 51 हजार रुपये काढून घेवून हाजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी अज्ञात अंदाजे 30 ते 35 वयाच्या तरुणाविरुध्द पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी नवनाथ शहाजी सपताळे हे हाजापूर येथे प्राथमिक शिक्षक असून त्यांनी घराचे बांधकाम करण्यासाठी नोकरीतील फंडाचे 3 लाख 75 हजार रुपये खात्यावर जमा करण्यासाठी बँकेत अर्ज दिला होता. दि.22 रोजी रक्कम जमा झाल्याने सदर खात्यावरील 15 हजार फोन पे वरुन शंकर लवटे यांचे खात्यावर जमा केले. तद्नंतर फिर्यादीची मुलगी संजीवनी हिचे फोन पे वर 22 हजार रुपये जमा केले. त्यानंतर दि.25 रोजी मित्र मोहन याचे खात्यावर 3 हजार 200 जमा केले. तसेच सिध्दनाथ ज्वेलर्स यांनाही फोन पे वरुन 15 हजार रुपये जमा केले. दुपारी 12.40 वाजता मित्र दिलीप घोडके यांचे हातउसणे घेतलेले पैसे देण्यासाठी फिर्यादी हे ए.टी.एम. कार्ड घेवून बँक ऑफ इंडिया येथे गेले. ए.टी.एम. मशीनमध्ये कार्ड घालून पैसे काढत असताना रिमुव्ह टू कार्ड असा मशीनने संदेश दिल्याने त्यावेळी माझ्या पाठीमागे उभे असलेला अंदाजे 30 ते 35 वयोगटातील इसम म्हणाला तुमचे ए.टी.एम.कार्ड मला द्या पैसे काढून देतो. ए.टी.एम. कार्ड त्यास दिल्यानंतर मशीन मध्ये घालून सदर व्यक्तीने पीन कोड टाकण्यास सांगितला. फिर्यादीने पीन नंबर टाकत असताना अज्ञार आरोपीने न कळत पीन नंबर माहित करुन घेतला व मशीनमधून पैसे निघत नाहीत असे तो म्हणाला.
त्यावेळी अज्ञात आरोपीने हातचालाखी करुन महेश महासागर (गुंजेगाव) यांच्या नावे असलेले एस.बी.आय. बँकेचे ए.टी.एम कार्ड फिर्यादीला दिले. दि. 25 रोजी दुपारी 1.58 वाजता भारतीय बँकेचा मेसेज आला. खात्यामधून 1 लाख 51 हजार रुपये काढून फसवणूक केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास वाघमोडे हे करीत आहेत.

