कासेगाव हद्दीत ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित पंढरपूर एम आय डी सी चे लवकरच भूमिपूजन : आ.समाधान आवताडे
आ.समाधान अवताडे यांचा मास्टर स्ट्रोक मंगळवेढा उपसा सिंचन योजनेनंतर पंढरपूर एमआयडीसीला मंजुरी
मंगळवेढा प्रतिनिधी
पंढरपूर औद्योगिक वसाहतीसाठी कासेगाव हद्दीतील ५४ एकर जमीन उद्योग मंत्रालयाने ‘औद्योगिक क्षेत्र ‘ म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे पंढरपूर एम आय डी सीच्या उभारणीला आता गती येणार आहे. लवकरच midc चे भूमिपूजन होणार असल्याची माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली. गेल्या तीन पिढ्यापासून अनेक आमदारांनी केवळ एमआयडीसी उभारण्याची आश्वासने दिली परंतु आमदार समाधान आवताडे यांनी पहिल्याच प्रयत्नात कासेगाव येथे एमआयडीसी उभी करून या परिसरातील युवकांचे गेल्या तीन पिढ्यापासूनचे पांग फेडले असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे.
पंढरपूर तालुक्यातील हजारो युवक रोजगाराच्या शोधत पुण्या – मुंबईला जातात. स्थानिक पातळीवर एम आय डी सी असावी अशी मागणी अनेक दशकांपासून केली जात आहे. मात्र आजवर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी एम आय डी सी मंजूर झाली नाही. बऱ्याच वेळी स्थानिक राजकारणाच्या कुरघोडी मुळे एम आय डी सी उभारणीत खोडा घातला जात होता. परंतु आ. समाधान आवताडे यांनी गेल्या केवळ दोन वर्षात सातत्याने पाठपुरावा करून, कासेगाव हद्दीत एम आय डी सी मंजूर करून घेतली. आणि आज ( दि. २१ ऑगस्ट) पासून कासेगाव हद्दीतील गट नंबर १९४७/४,१९४७/६, १९४७/ ८ मधील हे क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून उद्योग मंत्रालयाने जाहीर केले आहे. त्यामुळे लवकरच पंढरपूर एम आय डी सी उभारणीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. येथील औद्योगिक वसाहतीच्या उभरणीतील महत्वाचा टप्पा पार झाला आहे. आ. समाधान आवताडे यांनी मागील दोन वर्षांपासून यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा केला आहे.कासेगाव हद्दीतील जागेचा प्रस्ताव औद्योगिक विकास महामंडळास पाठवला होता.औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासेगाव येथे येऊन जागेची पाहणी केली होती. त्यानंतर आ. आवताडे यांनी उद्योग मंत्रालय, औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडे सतत पाठपुरावा चालू ठेवला होता.
अखेर आज ( दि २१ रोजी ) उद्योग मंत्रालयाकडून राज्यपालांच्या आदेशानुसार ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. आ. आवताडे यांनी उद्योग मंत्रालयाचे सहसचिव संजय देगावकर यांच्याकडून हा अध्यादेश स्वीकारला आहे. त्यानंतर आवताडे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचेही आभार मानले आहेत.
पंढरपूर येथील एम आय डी सी. च्या उभरणीतील कासेगाव हद्दीतील जागा निश्चित केल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील हजारो बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळण्यासाठी मदत होणार आहे. शिवाय तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या औद्योगिक विकासाला ही चालना मिळणार आहे.
पंढरपूर येथे अभियांत्रिकी महाविद्यालयांसह चांगल्या उच्च शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवर उपलब्ध आहे. भीमा नदी मुळे एम आय डी सी करिता पाणी उपलब्ध आहे. शिवाय पंढरपूर शहर आणि तालुक्यात आता पक्क्या रस्त्याचे जाळे निर्माण झाले आहे. शिवाय रेल्वे सेवा पंढरपूर पर्यंत चालू आहे. त्यामुळे दर्शन एम आय डी सी उभारण्यासाठी पोषक परिस्थिती पंढरपूर मध्ये आहे, मात्र आजवरच्या राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला होता.
*कोट*
पंढरपूर तालुक्यात गेल्या दहा वर्षांपासून मी सार्वजनिक काम करतोय, या दरम्यान हजारो युवकांनी एम आय डी सी ची गरज बोलून दाखवली. आणि मलाही याची गरज जाणवत होती. सुदैवाने पोटनिवडणुकीत जनतेने आमदार केले..त्यानंतर एम आय डी सी चा विषय मी प्राधान्याने हाती घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री ना.उदय सामंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सहकार्यामुळे लवकरात लवकर हा विषय मार्गी लावता आला याचे समाधान आहे. जागा निश्चित झाली आहे आता लवकरच भूमिपूजन करू
-आ.समाधान आवताडे
*कोट*
पंढरपूर शहर आणि तालुक्यात कुशल मनुष्यबळ, चांगली रस्ते कनेक्टीव्हीटी, रेल्वे सेवा, मुबलक पाणी, साखर कारखानदारी, फळ शेती असल्याने उद्योगासाठी पोषक वातावरण आहे..मात्र एम आय डी सी अभावी हजारो युवकांना रोजगार शोधत बाहेर जावे लागत होते. अनेकांना जागेअभावी उद्योग उभा करता आले नाहीत, काही उद्योजक तालुक्या बाहेर निघून गेले. मात्र आता एम आय डी सी मंजूर झाल्याने पंढरपूरच्या उद्योगाच्या विकासाला संधी मिळेल, रोजगार वाढेल
– बाळकृष्ण सूर्यवंशी,
उद्योजक अनवली, पंढरपूर

