मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर 2023 या दरम्यान मुदत संपणाऱ्या नवनिर्मित तसेच 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरून निवडणुका न होऊ शकलेल्या 27ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक व एका ग्रामपंचायतीचा पोट निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी मंगळवारी जाहीर केला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून निवडणुका कधी लागणार याकडे आस लावून बसलेले इच्छुक आता खऱ्या अर्थाने कामाला लागले असून ऐन दिवाळीत निवडणुकीचा धुरळा उठणार असल्याने निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांची देखील दिवाळी होणार आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज दिनांक3रोजी राज्यातील हजारो ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्यपदाच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 6 ऑक्टोबरला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, 16 ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 ते 3 या वेळेत नामांकन दाखल करणे, 23 ऑक्टोबरला दाखल अर्जाची छाननी तर 25 ऑक्टोबरपर्यंत नामांकन माघारी घेण्याची मुदत असणार आहे. निवडणुकीसाठी मतदान 5 नोव्हेंबरला तर 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
मंगळवेढा तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित व 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम देण्यात आला आहे.निवडणुकीस पात्र असलेल्या ग्रामपंचायतीची अंतिम प्रभाग रचना 25 एप्रिलला राज्य निवडणूक आयोगाने आलेल्या हरकती विचारात घेऊन अंतिम केली आहे.त्यानुसार निवडणुका जाहीर झाल्या असून मंगळवेढा तालूक्यातील 27 ग्रामपंचायत तीसह एका ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होणार आहे. त्यामध्ये आंधळगाव, नंदूर, लक्ष्मी दहिवडी ब्रम्हपुरी,हिवरगाव,भाळवणी,मुंढेवाडी,मानेवाडी, शिरसी, जंगलगी, खडकी, बठाण ,रेवेवाडी,निंबोणी, चिक्कलगी,पडोळकरवाडी,शेलेवाडी, डिकसळ, जालीहाळ,लोणार,खुपसंगी, रड्डे, महमदाबाद हु,देगाव, उचेठाण, जुनोनी,अकोला येथील निवडणूक जाहीर झाली आहे.
मंगळवेढा तालुक्यात सध्या विद्यमान भाजपाचे आ समाधान आवताडे,सहकारातील जेष्ठ नेते बबनराव आवताडे, भाजपाचे सहयोगी माजी आ प्रशांत परिचारक, बी आर एस चे भगीरथ भालके, शिंदे शिवसेना गटाचे अनिल सावंत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित पाटील,अजित पवार गटाचे लतिफ तांबोळी,रामेश्वर मासाळ, काँग्रेस, शिवसेना,वंचित बहुजन आघाडी बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे गट कार्यरत असून निवडणुकीतील गावपातळीवरील परिस्थिती पाहून निवडणुका लढवणार आहेत. प्रामुख्याने आंधळगाव,ल दहिवडी,ब्रम्हपुरी, हिवरगाव,शेलवाडी, बठाण ,रेवेवाडी,भाळवणी,
चिक्कलगी, जंगलगी,आदी गावातील निवडणुका चुरशीच्या होण्याची शक्यता असून सरपंच पदाची निवडणूक ही जनतेतून होणार असल्याने निवडणुकीत अधिकच रंगत येणार आहे.गेल्या अनेक दिवसापासून लांबलेल्या निडणुकांचा धुरळा दिवाळीत उडणार असल्याने मतदार राजाची मात्र दिवाळी उत्साहात साजरी होणार असली तरी इच्छुकांचे मात्र दिवाळं निघणार आहे.असे असलेतरी विरोधकांची एकदा जिरवल्याशिवाय माघार घ्यायची नाही असा चंग बांधलेली नेतेमंडळी मात्र निवडणुकात आपला आवाज करण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे.

