मंगळवेढा प्रतिनिधी
10 मार्च रोजी ‘लढा पंचायतीचा’ हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे या निमित्ताने मंगळवेढा येथील खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सिद्धेश्वर बबनराव आवताडे यांच्या शुभहस्ते ‘लढा पंचायतीचा’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण सिद्धेश्वर बबनराव आवताडे संपर्क कार्यालयामध्ये करण्यात आले.
यावेळी सिद्धेश्वर आवताडे यांनी या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देताना म्हणाले सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला मधील डॉ.पद्मजा खटावकर यांनी लिहिलेल्या कथेवर हा चित्रपट तयार झाला असून ग्रामविकास अधिकारी असलेल्या पद्मजा खटावकर यांना आलेल्या अनुभवातून आणि कोरोनातील वास्तव गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या चित्रपटाला एक वास्तव रूप मिळाले असून ग्राम स्तरावर मुख्य गाभा असलेल्या ग्रामसेवकांनी गावातील विविध शासकीय कर्मचाऱ्यांना एकत्रित करून गावातील होतकरू लोकांना एकत्र करून या कोरोनाचा लढा कसा जिंकला गावात वात्रट लोकांनी ज्या काही गमती जमती केल्या त्या ही या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मांडले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप पाटील, निर्माते पोपटराव खटावकर यांनी हे शिवधनुष्य त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चांगल्या पद्धतीने केलेले दिसून येते. हा चित्रपट मी स्वतः पहायला जाणार असून सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पहावा . 10 मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे या चित्रपटाच्या माध्यमातून तो कोरोनाचा एक वेगळा अनुभव तुम्हाला पुन्हा एकदा अनुभवता येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
लढा पंचायतीचा या चित्रपटाच्या पोस्टर चे अनावरण करतेवेळी या चित्रपटात काम केलेल्या मुख्य अभिनेत्री पद्मजा खटावकर, संभाजी कोकरे, मुरलेंद्र शेटे, सचिन जाधव, अजित अथर्व जगदाळे, अर्णव जगदाळे,देवानंद खटावकर, संदीप पाटील, पाठखळ वि.का.सेवा सोसायटीचे संचालक विठ्ठल गुरव, दादा बुरजे, सागर जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.