मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील घरनिकी – अकोला रस्त्याला जोडणारा मारापुर शिवरस्ता येथे गट क्र 172 व 177येथे पूर्वीपासून वहिवाट असलेला रस्ता संबधित शेतकऱ्याने गेल्या दीड वर्षापासून अडवला होता. याबाबत येथील 20 शेतकऱ्यांनी तहसीलदार स्वप्निल रावडे मंगळवेढा यांच्या न्यायालयात दाद मागितल्यानंतर तहसीलदारांनी याबाबत पूर्वीपासून असलेला रस्ता खुला करण्याचे आदेश दिल्याने हा रस्ता पोलीस बंदोबस्तात वाहतुकीस खुला करण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की घरनिंकी अकोला रस्त्याला जोडणारा मारापुर शिव रस्ता गट क्रमांक 172 व 177 येथे संबंधित शेतकऱ्याने वहिवाटीचा रस्ता असताना सुद्धा येथील वाट जाणून बुजून अडवून धरली होती. त्यामुळे येथील संतोष रामचंद्र यादव व इतर 20 शेतकऱ्यांनी मंगळवेढा तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी स्वप्निल रावडे यांच्या न्यायालयात दाद मागितली होती. सर्व बाजूचा उपलब्ध कागदपत्रांचा विचार करता तहसीलदार मंगळवेढा यांनी ह्या रस्त्याबाबत आदेश देत जुन्या वहिवाटीप्रमाणे हा रस्ता वाहतुकीस खुला करण्याचे आदेश दिले. तसेच या रस्ता केस प्रकरणी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांना संबधित अर्जदार शेतकऱ्यांना पोलिस बंदोबस्त देण्याचे देखील आदेश दिले होते.
त्यानुसार महसूल विभागाने पोलिसांच्या उपस्थितीत या रस्त्यावरील अतिक्रमण काढून हा शिव रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. हा रस्ता वाहतुकीस खुला केल्यामुळे येथील शेतकरी व नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.