मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील राष्ट्रीय महामार्गाच्या ब्रिजवर रस्त्याचे काम पूर्ण होवून देखील विजेचे पोल उभे न केल्यामुळे रात्री अंधारामुळे नागरिकांची गैरसोय होत होती त्यामुळे या ठिकाणी पोल उभे करून विजेची सोय करण्याची मागणी येथील भाजपा पदाधिकारी व ग्रामपंचायत यांनी सातत्याने खा जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे केली होती. संबंधित विभागाकडे त्यांनी पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले आहे
संबधित विभागाने याची दखल घेत याठिकाणी पोल बसवले असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव च्या लगत राष्ट्रीय महामार्ग गेला असून येथे ब्रिज उभारण्यात आला आहे. येथील रस्त्याचे काम पूर्ण झाले असून गेल्या वर्षभरापासून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. परंतु या ब्रिजवर विजेचे खांब न बसवल्यामुळे रात्रीच्या वेळी या भागात मोठ्या प्रमाणात अंधार पडत होता. ब्रिजच्या शेजारी डोंगरगाव रस्ता, खुपसंगी रस्ता चिंचाळे रस्ता, गोणेवाडी रस्ता व आंधळगावात जाणारा मार्ग असून रात्री अप रात्री विजेची सोय नसल्याने येथे हा भाग अंधकारमय होत असल्यामुळे त्या रस्त्यावरून जाणे प्रवाशांना धोकादायक होते. तसेच येथील अंधाराचा फायदा घेऊन चोरटे व इतर अवैध व्यवसाय वाढीस लागले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी या परिसरात भीतीयुक्त वातावरण राहिल्यामुळे महिला व लहान मुलांसह पादचाऱ्यांना येथून प्रवास करणे त्रासदायक होत होते.
त्यामुळे येथील ब्रिजवर विजेचे खांब बसून हा परिसर प्रकाशमय करण्याची मागणी येथील भाजपाचे पदाधिकारी शशिकांत चव्हाण, दामाजीचे संचालक औदुंबर वाडदेकर, गौरीशंकर बुरकुल, दिगंबर भाकरे, माजी जी प सदस्य शिवाजीराव नागणे, दत्तात्रय भाकरे, आप्पासाहेब स्वामी, चंद्रकांत जाधव यांच्यासह सुरेश भाकरे, सरपंच शांताबाई भाकरे, उपसरपंच आदम मुलानी यांनी खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकाऱ्यांनी येथील ब्रिजवर गेल्या दोन दिवसापासून विजेचे खांब उभारणीचे काम हाती घेतले असून दोन-तीन दिवसात हा भाग प्रकाशमय होणार आहे तसेच गेल्या अनेक दिवसापासून अंधारात असणारा हा भाग प्रकाशाने उजळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.