महावितरणने सक्तीची वीज वसुली व वीजतोडणी तात्काळ थांबवावी अन्यथा स्वाभिमानीचे तीव्र आंदोलन

अधिक्षक अभियंता यांना  स्वाभिमानीचे निवेदन

 

मंगळवेढा प्रतिनिधी

       जिल्ह्यातील शेती पंपाची विज तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी महावितरणचे उपअधीक्षक अभियंता संजीवकुमार शिंदे यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे

              सोलापूर जिल्हयामध्ये विद्युत वितरण कंपनीमार्फत विद्युत कंपनीचे कर्मचारी शेती पंपाची लाईट कनेक्शन बंद करणे चालु केले आहे. डिपी बंद केले जात आहेत. शेतकऱ्यांना कुठलीही पूर्व कल्पना न देता लाईट बंद केली जात आहे. शेतकऱ्यांची पिके गहु, द्राक्ष, कलिंगड, पालेभाज्या ही पिके उन्हाळयाचे दिवस सुरु झाल्याने जर चार दिवस लाईट बंद झाली तर ही पिके नष्ट होवून जातात. या नुकसानीस जबाबदार कोण? शेतकरी चालु बिलाचे पाच हजार रुपये प्रमाणे बिल भरण्यास तयार आहे. काही शेतकऱ्यांची पिके काढणीस सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांची उसाची बिले कारखान्याकडून येणे आहेत. ते पैसे आल्यानंतर शेतकरी चालू बिल पाच हजार रुपये प्रमाणे भरतील. अनेक शेतकऱ्यांच्या दारावरती जनावरे पाण्यासाठी तडपडत आहेत.

            शेतकऱ्यांना पाण्यासाठी बाकीची कामे सोडून पाणी विकत आणुन जनावरे जगवावी लागत आहेत.तरी विज कनेक्शन कट करण्याची चालु असलेली मोहिम त्वरीत थांबवावी अन्यथा असंख्य शेतकरी आपल्या दारातील जनावरे घेवून एम.एस.सी.बी. च्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करतील याची जबाबदारीने नोंद घ्यावी असे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी निवेदनात नमूद केले आहे यावेळी दिलीप जाधव उपस्थित होते. शेतकऱ्यांनी किमान पाच हजार रुपये वीज बिल भरून कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणचे संजीवकुमार शिंदे यांनी केले.

 

         सत्तेवर येण्याअगोदर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मंत्री आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर शेतकऱ्याचे वीज बिल माफ करावे म्हणून ओरडत होते मात्र आज तेच सत्ताधारी पक्षातील नेते मूग गिळून गप्प का आहेत तरी शेतकऱ्याविषयी जरा तरी आपणाला संवेदना असतील तर सरकारने शेतीपंपाची चालू असलेली वीज तोडणी त्वरित थांबवावी अन्यथा संघर्ष अटळ आहे

—- युवराज घुले, जिल्हा संघटना

Comments (0)
Add Comment