आषाढी वारी मध्ये महावितरणने विना अपघात दिली  अखंडितपणे उत्कृष्ट सेवा

300 अधिकारी व कर्मचारी यांचे सेवेसाठी राबले हात

पंढरपूर प्रतिनिधी
विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात 12 लाखाहून अधिक भाविक दाखल झाले असताना पंढरपूर शहर, पालखी मार्ग व परिसरात महावितरणच्या सुमारे 300 कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस राबवून अखंडित व कोणताही अपघात न होता सेवा देऊन उत्कृष्टपणे कामगिरी बजावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने प्रशासनाच्या नियोजनबद्ध कारभाराचे कौतुक केले असून यात महावितरणचा देखील मोठा वाटा असल्याने सुरळीत वारी पार पडल्याने वारकरी व्यापारी, व नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.
          पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी वारी निमित्त राज्यभरातून व इतर राज्यातून लाखो भाविक दाखल होत असतात. या वारकऱ्यांना चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी येथील प्रशासन नेहमी सज्ज असते. या प्रशासनातील महत्त्वाचा भाग महावितरण असून पंढरपूर शहर, पालखी मार्ग आसपासची गावे तसेच विविध व्यावसायिक, व्यापारी यांना चांगल्या पद्धतीने वीजपुरवठा करणे हे महावितरणचे काम आहे. 300जणांच्या राबणाऱ्या हातामुळे पुणे व इतर जिल्ह्यातून पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर पालख्या मार्गातील दाखल वारकऱ्यांना विजेपासून कोणताही धोका होऊ नये याची काळजी मात्र महावितरणने घेतल्याचे दिसून आले.

           याबाबत दुरूस्तीची सर्व कामे येथील पंढरपूर विभागाच्या वतीने वेळेत करण्यात आली होती. तसेच वारीच्या नियोजनासाठी अधिकारी वर्ग व कर्मचारी असे एकूण तीनशे कर्मचारी कार्यरत ठेवले होते. प्रत्येक कर्मचाऱ्याला आपला विभाग व काम वाटून दिल्याने विठ्ठलाची सेवा मानुन या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या जागी थांबून आपली सेवा अचूकपणे पार पाडली आहे. पालख्या पंढरपुरात दाखल झाल्यानंतर लाखो भाविक शहरात वावरत असतात या भाविकांना कोणताही धोका होऊ नये तसेच व्यापारी वर्ग व इतर व्यवसायिकांना वीज पुरवठा खंडित होऊन व्यवसायाला अडथळा येऊ नये याची खबरदारी महावितरण कंपनीच्या वतीने घेण्यात आली होती.तसेच मागेल त्या व्यवसायिकांना वीजपुरवठा दिला होता. शहरात अनेक ठिकाणी विजेची पर्यायी व्यवस्था केली होती. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार सर्व यंत्रणा उभी केली होती.

          मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, नूतन कार्यकारी अभियंता विजय पाटील, प्रभारी कार्यकारी अभियंता भिकाजी भोळे, उपकार्यकारी अभियंता रवींद्र भुतडा, उपकार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांच्यासह उप कार्यकारी अभियंता,सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, वायरमन, लाईनमन,ठेकेदार यांनी योग्य पद्धतीने नियोजन करीत ग्राहकांना व वारकऱ्यांना चांगली सेवा दिल्याने विना अपघात आषाढी वारी पार पडली. महावितरणच्या उत्कृष्ट सेवेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments (0)
Add Comment